सध्या आखातात वाढत असलेल्या युद्धतणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनीचे महत्त्व पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सामान्यतः ही सामुद्रधुनी जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, याच समुद्री मार्गाखाली जगभरातील इंटरनेट नेटवर्कसाठी अत्यावश्यक असलेल्या फायबर ऑप्टिक केबल्स टाकण्यात आल्या आहेत. या केबल्समधूनच आशिया, मध्य पूर्व आणि युरोपमधील देशांदरम्यान इंटरनेट डेटा मोठ्या प्रमाणात पाठवला जातो.
advertisement
महाराष्ट्रातील असं मंदिर, जिथं 90 वर्षांपासून सुरू आहे अखंड दिवा, इतिहास तुम्हाला माहितीये का?
भारताची आंतरराष्ट्रीय इंटरनेट कनेक्टिव्हिटीही मोठ्या प्रमाणात अरबी समुद्रातून आखाती देश आणि युरोपकडे जाणाऱ्या या समुद्राखालील केबल्सवर अवलंबून आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतातून पश्चिमेकडे जाणाऱ्या इंटरनेट ट्रॅफिकपैकी जवळपास एक तृतीयांश डेटा या मार्गातून जातो. त्यामुळे या परिसरात युद्ध किंवा लष्करी हालचाली वाढल्यास आणि त्यातून समुद्राखालील केबल्सचे नुकसान झाल्यास इंटरनेट सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.
सायबर तज्ज्ञांच्या मते, समुद्राखालील फायबर ऑप्टिक केबल्स हे जागतिक इंटरनेट नेटवर्कचे कणा मानले जातात. या केबल्समध्ये कोणतेही नुकसान झाले तर इंटरनेटची गती कमी होणे, व्हिडिओ कॉलमध्ये अडथळे येणे, तसेच काही डिजिटल सेवा तात्पुरत्या खंडित होणे अशा समस्या उद्भवू शकतात. विशेषतः बँकिंग, फायनान्स, ऑनलाइन व्यवहार, सोशल मीडिया आणि न्यूज प्लॅटफॉर्म यांसारख्या सेवांवर त्याचा परिणाम जाणवू शकतो.
इंटरनेट तज्ज्ञ डॉ. निरंजन भुसनाळे यांच्या मते, इराण आणि भारत यांच्या दरम्यान समुद्राखाली अनेक ऑप्टिकल फायबर केबल्स टाकण्यात आल्या आहेत. या केबल्स इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. युद्धस्थितीत जर या केबल्सना नुकसान झाले किंवा त्यांच्यावर हल्ला झाला, तर इंटरनेटची गती कमी होण्यासोबतच बँकिंग, फायनान्स आणि व्हिडिओ कम्युनिकेशनसारख्या सेवांवर परिणाम होऊ शकतो.
एकूणच, होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव वाढल्यास त्याचा परिणाम केवळ तेलपुरवठ्यावरच नव्हे तर इंटरनेटसारख्या अत्यावश्यक डिजिटल सेवांवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील घडामोडींवर जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रासह अनेक देशांचे लक्ष लागले आहे.





