मधुबनी : जिथं इच्छा असेल तिथं मार्ग दिसेल, असं म्हटलं जातं, असेच एका मुलीने सिद्ध करुन दाखवलं आहे. बबिता असे या तरुणीचे नाव आहे. तिचे आई वडील मजूरी करतात. तिच्या परिसरातील अकरावी-बारावीचे शिक्षण घेणारी ती पहिली मुलगी होती. अत्यंत कठीण परिस्थितीतून तिने आज बिहार लोकसेवा आयोगाची अत्यंत मानाची परीक्षा पास होत लेखा अधिकारीपदाला गवसणी घातली आहे.
advertisement
बबिता ही बिहारच्या मधुबनी येथील रहिवासी आहे. अधिकारी पदापर्यंतचा तिचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. तिचे वडील सुरेंद्र राम अशिक्षित होते. मात्र, तरीही त्यांनी आपल्या मुलीला शिक्षणासाठी पाठिंबा दिला. वडिलांच्या संघर्षाने बबिताचे करिअर बनवले. बबिता आता लेखा अधिकारी बनली आहे.
बसैठा गावातील काही लोकं शिक्षित आहेत. मात्र, बबिताच्या परिसरातील बहुतांश लोकं हे साक्षर नाहीत. त्यामुळे पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणारी बबिता ही त्या परिसरातील पहिली तरुणी आहे. तिचे बालपण खूप कठीण परिस्थितीत गेले. तिला दोन भाऊ आणि एक बहीण आहे. तिचे वडील सुरेंद्र कुमार हे कधी 300 तर कधी 500 रुपयांच्या रोजंदारीवर कामाला आहेत. त्यातूनच त्यांचे घर चालते.
2020 मध्ये बीपीएससी कडून झालेल्या परिक्षेमध्ये बबिताने हे यश मिळवले आहे. तिची लेखा अधिकारीपदी निवड झाली आहे. आमच्या मुलीला सरकारी नोकरी लागली, या भावनेतून तिच्या आई-वडिलांना गहिवरुन आले आहे.
पाटण्यातच करतेय नोकरी -
बबिताच्या निवडीनतर त्यांच्या आर्थिक परिस्थितीत थोडी सुधारणा झाली. येणाऱ्या काही महिन्यात त्यांचे घरही तयार होईल. मात्र, अद्यापही तिचे वडील मजूरी करतात. पाटणा येथे त्यांची मुलगी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. अत्यंत कठीण परिस्थितीत हे यश मिळवणारी बबिताची कहाणी ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
