आयएएस अधिकारी श्रद्धा गोमे मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी सुरुवातीचं शिक्षण इंदूरमधून पूर्ण केलं. शाळेपासून ते कॉलेजपर्यंत जवळपास प्रत्येक परीक्षेत श्रद्धा टॉपर होत्या. श्रद्धा यांचे वडील रमेश कुमार गोमे हे सेवानिवृत्त एसबीआय अधिकारी आहेत आणि आई वंदना गृहिणी आहेत. त्यांचा भाऊ रोहित कायद्याचं शिक्षण घेत आहे.
श्रद्धा यांनी सीबीएसई बोर्डाशी संलग्न असलेल्या सेंट. राफेल्स एच.एस. शाळेतून शिक्षण घेतलं. 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षेत त्या इंदूर शहरात पहिल्या आल्या होत्या. शाळेत असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वादविवाद स्पर्धा जिंकली होती. अभ्यासासोबतच अभ्यासाशी संबंधित एक्स्ट्रॉ करिक्युलर अॅक्टिव्हिटींमध्ये त्या खूप सक्रिय होत्या.
advertisement
कायद्याच्या प्रवेश परीक्षेत (क्लॅट) टॉप केलं होतं. त्यांच्या गुणांच्या आधारे त्यांना बेंगळुरूतील NLSIU कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. 2018 मध्ये त्या बीए एलएलबी उत्तीर्ण झाल्या. कायद्याचा अभ्यास करताना त्यांनी एकूण 13 सुवर्णपदकं मिळवली होती. स्वत: सरन्यायाधीशांनी त्यांचा गौरव केला होता. कायद्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये कायदेशीर व्यवस्थापक म्हणून नोकरी मिळाली होती. तिथे मोठा पगारही मिळत होता.
श्रद्धा यांनी नोकरी न करता यूपीएससीची तयारी सुरू केली. इंदूरमध्ये राहून त्यांनी सेल्फ स्टडी केला. त्यांनी यूपीएससीचा अभ्यासक्रम आणि गेल्या काही वर्षांतील प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास केला. ऑप्शनल विषयासाठी लॉ नोट्स पुन्हा वाचून काढल्या. तयारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात 2020 मध्ये त्या दररोज आठ ते दहा तास अभ्यास करत होत्या.
यूपीएससी प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी त्या दिल्लीला गेल्या होत्या. श्रद्धा 15 दिवस दिल्लीत राहिल्या. तिथे त्यांनी अनेक मॉक इंटरव्ह्यु दिले. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात 60 वी रँक मिळवली. 2022 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या श्रद्धा राजस्थान केडरमध्ये कार्यरत आहेत. सध्या त्या अजमेरमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त आहेत. त्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.