लुधियानाच्या शेरपूर परिसरात लोकांना निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये मृतदेह आढळला आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. यावेळी स्थानिकांनी आसपासच्या परिसरात शोध घेतला असता त्यांना एका निळ्या ड्रममधून दुर्गंधी येत असल्याचं समजलं. यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ड्रम उघडला तेव्हा त्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. जो प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला होता. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाचे पाय आणि मान दोरीने बांधलेली होती.
advertisement
या घटनेची अधिक माहिती देताना तपास अधिकारी कुलवंत कौर म्हणाल्या की, मृताचा चेहरा पाहून तो स्थलांतरित असल्याचे दिसून येते. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. सध्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा आढळल्या नसल्या तरी, मृतदेहाची स्थिती खूपच वाईट आहे. ज्यामुळे हे स्पष्ट होते की ही घटना अनेक दिवस जुनी असू शकते. पण ड्रम अगदी नवीन आढळला. ज्यामुळे ही हत्या पूर्ण योजनेनुसार करण्यात आली असावी आणि मृतदेह लपवण्यासाठी एक नवीन ड्रम खरेदी करण्यात आला असावा, असा अंदाज व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात, पोलिसांनी लुधियानामधील सुमारे ४२ ड्रम उत्पादक कंपन्यांची यादी तयार केली आहे आणि त्यांना हे ड्रम अलीकडे कोणाला विकले गेले याची चौकशी केली जात आहे.पोलिसांनी घटनास्थळापासून ५ किमीच्या परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासायला करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील कॅमेरे, रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड कॅमेऱ्यांच्या मदतीने संशयास्पद हालचाली तपासल्या जात आहेत. पोलिसांनी काही संशयास्पद वाहनांचे नंबर देखील ओळखले आहेत, ज्यांचा तपास सुरू आहे.