मारहाण झाल्यानंतर घायवळवर हल्ला करणारा तरुण घटनास्थळावरून पसार झाला. त्यामुळे घायवळवर हल्ला करणारा तरुण नक्की कोण आहे? तो कोणत्या टोळीचा सदस्य आहे? घायवळ हल्ला करण्याचा त्याचा हेतू काय होता? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित झाले. आता वाशी पोलिसांनी निलेश घायवळवर हल्ला करणाऱ्या सागर मोहोळकरला ताब्यात घेतलं असून त्याच्याबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे.
advertisement
सागर मोहोळकर हा अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे. तो पेशाने पहिलवान असून शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या जत्रेला उपस्थित होता. गावात जत्रेनिमित्त कुस्तीचा फड भरला होता. सागर हाही इथं आला होता. याचवेळी पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळही कुस्ती पाहायला आला होता. इथं आल्यानंतर तो आयोजकांसोबत पहिलवानांना भेटण्यासाठी जात असताना अचानक सागरने घायवळवर हल्ला केला. गर्दीतून वाट काढत त्याने निलेश घायवळला कानशिलात लगावल्या.
या प्रकरणी आता वाशी पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल करत सागर मोहोळकरला ताब्यात घेतलं आहे. वाशी पोलीस त्याची कसून चौकशी करत आहे. पोलीस तपासात सागर मोहोळकरचा भयंकर इतिहास समोर आला आहे. तो कुस्तीच्या फडासह गुन्हेगारी क्षेत्राचा पक्का खिलाडी असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. कारण त्याच्यावर याआधी खुनाचे दोन गुन्हे दाखल असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी सागर मोहोळकरला एका खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्याला तुरुंगवास देखील झाला होता. खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असताना सागरने तुरुंगात आणखी एकाचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.