अक्रम कुरेशी असं हत्या झालेल्या 22 वर्षीय कॅब चालकाचं नाव आहे. तो ओला कॅब ड्रायव्हर होता. 17 जानेवारीला त्याला एका महिलेनं भिवंडी परिसरात भेटायला बोलावलं होतं. अक्रम कुरेशी त्याठिकाणी गेला असता, आधीच दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. लोखंडी रॉड आणि दगडाने मारहाण करत आरोपींनी अक्रमचा जीव घेतला. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद कैफ मोहम्मद रफिक कुरेशी, इसामुद्दीन रियाजुद्दिन कुरेशी, सलमान मोहम्मद शफिक खान, सुहेल अहमद कुरेशीसह एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय ?
मृत अक्रम कुरेशी आणि आरोपी मोहम्मद कैफ हे दोघंही मुळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील जमीनीवरून दोघांमध्ये कौटुंबीक वाद आहे. जुलै २०२२ मध्ये दोघांमध्ये जमीनीवरून वाद झाला होता. याच वादाचा बदला घेण्यासाठी आरोपी मोहम्मदने अक्रमच्या हत्येचा कट रचला. यासाठी त्याने आपली प्रेयसी जेस्सी तिवारीची मदत घेतली, आरोपीनं जेस्सीच्या मदतीने अक्रमला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. घटनेच्या दिवशी आरोपी जस्सीने त्याला भेटण्यासाठी भिवंडी परिसरात बोलावलं.
मयत अक्रम जस्सीला भेटायला भिवंडी येथे गेला असता, महिला कारमध्ये बसली. ती अक्रमला नियोजित स्थळी घेऊन गेली. कार घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिथे आधीच दबा धरून बसलेल्या चौघाजणांनी अक्रमवर लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला करत त्याची हत्या केली. यानंतर सर्वजण घटनास्थळावरून फरार झाले. १७ जानेवारीला हत्येची ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे काहीच क्लू नव्हता. हत्या कुणी केली, कशासाठी गेली? याबाबत कोणताच सुगावा पोलिसांना नव्हता.
पण कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुन्ह्याचा तपास करत पाचही जणांना बेड्या ठोकल्या. या हत्येचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. यावेळी मयत अक्रम हा एका महिलेसोबत कारमधून जात असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आलं. यानंतर पोलिसांनी ओळख पटवत महिलेची चौकशी केली. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच महिलेनं पोपटासारखं बोलायला सुरुवात केली. तिने कटाबद्दलची माहिती पोलिसांना दिली. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहम्मद कैफ मोहम्मद रफिक कुरेशी, इसामुद्दीन रियाजुद्दिन कुरेशी, सलमान मोहम्मद शफिक खान आणि सुहेल अहमद कुरेशी यांना उत्तर प्रदेशातून अटक केली. हे सर्व आरोपी उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्हयाच्या हैदरपूर येथील रहिवासी आहेत. या घटनेचा पुढील तपास भिवंडी पोलीस करत आहेत.