मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी रणकपूर एक्स्प्रेस दादर रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी रेल्वेतील सर्व प्रवासी याठिकाणी उतरले. संपूर्ण रेल्वे रिकामी झाली होती. प्रवासी रेल्वेतून उतरल्यानंतर आरपीएफच्या जवानांकडून रेल्वेची तपासणी केली जात होती. दरम्यान, रणकपूर एक्स्प्रेसच्या एका बाथरुमचा दरवाजा आतून बंद असल्याचं आरपीएफ जवानाच्या लक्षात आलं. त्यांनी दार वाजवून आतल्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा उघडला नाही. शिवाय आतून काहीच आवाज आला नाही.
advertisement
यामुळे संशय आल्यानंतर पोलिसांनी बाथरुमचा दरवाजा तोडला. पण आतील दृश्य पाहिल्यानंतर पोलीसही हादरले. आतमध्ये एक व्यक्ती टॉवेलने गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकली होती. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून मृतदेहाची तपासणी केली, यावेळी मृताच्या खिशात कसलंही ओळखपत्र किंवा मोबाईल आढळला नाही. त्यामुळे मृत व्यक्ती नक्की कोण आहे, ती रेल्वेत कुठून आली? तिने आत्महत्या केली की त्याच्यासोबत घातपात घडला? याची कसलीच माहिती पोलिसांना मिळाली नाही.
प्राथमिक अंदाजानुसार, संबंधित व्यक्तीने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं खरं कारण समोर येऊ शकतं. तूर्तास पोलीस मृताची ओळख पटवण्याचं काम करत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत. मुंबईतील सर्वात जास्त गजबजलेल्या रेल्वे स्थानकात अशाप्रकारे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
