लहू चौधरी, अंकुश चौधरी, किशोर सुभाष चौधरी आणि अन्य एक व्यक्ती असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. तर मारुती शिवाजी इटाळकर असं हत्या झालेल्या १८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. गुरुवारी 8 मेला आरोपींनी मारुतीला लोखंडी रॉड, कोयता आणि लाकडी काठीने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत मारुतीचा मृत्यू झाला.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी मयत इटाळकरच्या बहिणीची छेड काढली होती. त्यामुळे इटाळकर आपला मित्र समर्थ जाधव याला घेऊन आरोपींकडे जाब विचारायला गेला होता. दोघंही गुरुवारी रात्री साडे सात वाजता बालाजीनगर परिसरातील प्रियदर्शनी दूध डेअरीच्या मागे गेले होते. यावेळी आरोपींनी बाचाबाची करत दोघांना मारहाण करायला सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर चारही आरोपींनी इटाळकरला बेदम मारहाण केली. या मारहाणीत इटाळकरचा मृत्यू झाला.
हत्येची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे नातेवाइकांनी इटाळकरचा मृतदेह धाराशीव पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आणला. येथे मृताच्या नातेवाइकांनी आक्रोश केला. पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला. ८ तारखेला हत्या झाल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच १० तारखेला पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.