नवी मुंबई : 'कानून के हात लंबे होते है' असा डायलॉग नेहमी आपण सिनेमात ऐकत असतो. पण आता नवी मुंबईत या डायलॉगचा प्रत्यय आला आहे. थोडे थोडके नाहीतर तब्बल 16 वर्षांपूर्वी चोरीला गेलेले सोन्याचे दागिने नवी मुंबई पोलिसांनी परत मिळवून दिले आहे. एवढंच नाहीतर चांदी, मोबाईल आणि दुचाकी असा १० लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी मालकांना परत दिला आहे.
advertisement
कोपरखैरणे पोलिसांनीही धडाकेबाज कामगिरी केली आहे. एका महिलेचे 16 वर्षांपूर्वी चोरी केलेले सोन्याचे दागिने तसंच कोपरखैरणे हद्दीतून चोरी आणि गहाळ झालेले 7 लाखांचे 28 मोबाईल, 2 किलो चांदीचे दागिने कोपरखैरणे पोलिसांनी मूळ मालकांना परत केले आहे. कौपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या एका छोट्याशा कार्यक्रमात पोलिसांनी मुळ मालकांना त्यांचा मुद्दे माल परत केला आहे. यामध्ये मागील एका वर्षात हरवलेले तसंच चोरीला गेलेले तब्बल 700 मोबाईल कोपरखैरणे पोलिसांनी मूळ मालकांना परत केले आहेत.
आपली हरवलेली वस्तू परत मिळेल याची 90 टक्के खात्री नव्हती, पण आता पोलिसांनी परत मिळवून दिली आहे. भाऊबीज निमित्त कोपरखैरण्यात आले असता रिक्षात माझा मोबाईल हरवला होता. मात्र हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्यामुळे आता त्याचा जास्त आनंद आहे, असं विक्रोळी इथं राहणाऱ्या शैला तळेकर यांनी म्हटलंय.
सुशीला बिहाडे यांचा देखील सोळा वर्षांपूर्वी रस्त्यावर त्यांचे चोरट्याने दागिने लंपास केलं होतं. ते देखील दागिने पोलिसांनी आज सुशीला यांना परत केले आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सुशीला यांनी देखील आनंद व्यक्त केला.
तसंच, कोपरखैरणेतील रहिवासी असलेल्या अमृत जैन यांचा देखील मोबाईल रेल्वे स्थानकावरून चोरीला गेला होता. जैन यांचा मोबाईल पोलिसांनी चक्क लखनऊमध्ये जाऊन चोराकडून परत आणला. एका मोबाईलसाठी पोलिसांनी केलेल्या आ कामगिरीबद्दल जैन यांनी आभार मानले. आपले चोरीला गेले साहित्य पोलिसांनी सुखरूपपणे परत आणून दिल्याबद्दल नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. सर्व मुळ मालकांनी पोलिसांच्या कामाचं कौतुक करत आभार व्यक्त केले.
