प्रियांका जाकाप्पा चव्हाण असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर जाक्काप्पा सोमनाथ चव्हाण असं आरोपीचं नाव आहे. आरोपी जाक्कापा हा आधी कर्नाटकातील बबळेश्वर काकटगी इथं राहत होता. तर त्याची पत्नी प्रियांका ही आपल्या आईसोबत सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी इथं राहत होते. घटनेच्या दिवशी रविवारी रात्री आठ वाजता दोघंही सांगलीच्या सरकारी घाट परिसरात फिरायला गेले होते.
advertisement
काही वेळ दोघांनी नदीच्या तिरावर बसून गप्पा मारल्या. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. अचानक दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी पत्नी खिशातून आणलेला चाकू बाहेर काढला आणि काहीही कळायच्या आत पत्नीच्या गळ्यावर वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की पुढच्याच क्षणात पत्नी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी जाकाप्पा घटनास्थळावरून पळून गेला.
या घटनेची माहिती मिळताच सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक विमला एम, पोलीस निरीक्षक संजय मोरे, मुकुंद कुलकर्णी यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत प्रियांका यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी हत्येसह विविध कलमांतर्गत पतीवर गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासानुसार, ही हत्या कौटुंबीक कारणातून झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादातून पत्नी आपल्या आईसोबत सांगलीवाडी इथं राहत होती. तसेच ती सांगलीतल्या एका साडीच्या दुकानात काम करत होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.