तुमच्या पुढे बसलेला ड्रायव्हर फक्त गाडी चालवत नसतो, तर त्याचे कान तुमच्या प्रत्येक शब्दावर असतात. बेंगळुरूमध्ये नुकतीच एक अशी घटना घडली आहे, जी ऐकून तुम्ही पुढच्या वेळी कॅबमध्ये बसल्यावर तोंडातून शब्द काढण्यापूर्वी दहावेळा विचार कराल. एका कुटुंबाने प्रवासात केलेली एक छोटीशा चूकीमुळे त्यांना 25 लाख गमवावे लागले.
बेंगळुरूच्या हेब्बल भागात राहणारे सय्यद सलमान आणि त्यांचे कुटुंब 11 फेब्रुवारी रोजी काही कामानिमित्त यशवंतपूरला जाणार होते. 3 दिवसांचा हा प्रवास असल्याने त्यांनी अब्दुल रहमान नावाच्या 40 वर्षीय ड्रायव्हरची कॅब बुक केली. प्रवासादरम्यान सलमान आपल्या पत्नीशी घराच्या सुरक्षेबद्दल चर्चा करत होते.
advertisement
बोलण्याच्या ओघात त्यांनी विचारलं, "अगं, कपाटाचं लॉक नीट लावलंय ना? त्यात सोनं ठेवलंय आपण!" एवढंच नाही, तर आपण पुढचे 3 दिवस घरी नसणार आहोत, हेदेखील त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं. ड्रायव्हर रहमानचे डोळे रस्त्यावर होते, पण त्याचं पूर्ण लक्ष सलमान यांच्या कपाटातल्या सोन्यावर खिळलं होतं.
25 लाखांच्या सोन्यावर डल्ला
कुटुंबाला यशवंतपूरला सोडल्यानंतर रहमानने आपले काम संपवले नाही, तर त्याने चोरीचा कट रचला. सलमान यांचे घर त्याने आधीच पाहिले होते. कुटुंब बाहेर गेल्याची खात्री पटताच त्याने घरात शिरून कपाटातील तब्बल 25 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. 3 दिवसांनी जेव्हा सलमान घरी परतले, तेव्हा त्यांना घर उघडं दिसलं आणि पायाखालची जमीनच सरकली.
सुरुवातीला पोलिसांना या चोरीचा कोणताही सुगावा लागत नव्हता. घरफोडी नक्की कोणी केली, हे समजत नव्हतं. पण हेब्बल पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज अत्यंत बारकाईने तपासले. तेव्हा त्यांना एक संशयास्पद कार एकाच दिवशी सलमान यांच्या घराच्या आसपास 8 वेळा घिरट्या घालताना दिसली.
पोलिसांनी गाडीचा नंबर शोधून काढला आणि तपास केला असता ती त्याच कॅब ड्रायव्हरची निघाली, ज्याने सलमान यांना यशवंतपूरला सोडले होते. पोलिसांनी रहमानला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याला चांगलंच बोलतं केलं, त्यानंतर त्याच्याकडून चोरीचं संपूर्ण सोनं जप्त करण्यात आलं आहे.
तपासात धक्कादायक बाब समोर आली की, रहमान हा सराईत गुन्हेगार आहे. प्रवाशांच्या गप्पा ऐकून त्यांच्या घराची माहिती काढणे आणि नंतर तिथे चोरी करणे ही त्याची जुनीच पद्धत होती. यापूर्वीही तो अशाच गुन्ह्यात तुरुंगात जाऊन आला होता आणि जामिनावर बाहेर येताच त्याने पुन्हा तेच कृत्य केलं.
प्रवाशांसाठी महत्त्वाच्या टिप्स:
कॅब किंवा सार्वजनिक वाहनात प्रवास करताना कधीही घराच्या चाव्या, मौल्यवान वस्तू किंवा घराच्या लॉकबद्दल बोलू नका.
तुम्ही किती दिवस बाहेर जाणार आहात, याची माहिती ड्रायव्हरसमोर देऊ नका.
ड्रायव्हरसोबत अवाजवी जवळीक साधणे टाळा.
घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे आणि डिजिटल लॉकसोबतच मॅन्युअल सुरक्षाही भक्कम ठेवा.
