प्राजक्ता मंगेश कांबळे असं हत्या झालेल्या २८ वर्षीय विवाहितेचं नाव आहे. तर मंगेश कांबळे असं आरोपी पतीचं नाव आहे. आरोपी मंगेशनं चारित्र्याच्या संशयातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात खूनासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश आणि प्राजक्ताचा आठ वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेम विवाह झाला होता. आरोपी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षापासून शिराळा तालुक्यातील मांगले येथे वास्तव्यास आहेत. मांगले वारणानगर रस्त्यावर ज्योतिबा मंदिरासमोर रामचंद्र वाघ यांच्या घरात ते भाड्याने राहतात. चार दिवसापूर्वी मंगेश त्याची पत्नी प्राजक्ता, सहा वर्षांचा मुलगा शिवम आणि तीन वर्षाची मुलगी शिवन्या यांना घेऊन मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते.
advertisement
घटनेच्या दिवशी गुरुवारी सकाळी भाऊ निलेश आणि देववाडी गेले होते. दरम्यान सकाळी दहाच्या सुमारास मंगेश आणि प्राजक्ता यांच्यात वाद झाला. तो वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताचा ओढणीने गळा अवळून खून केला. त्यानंतर आरोपीनं बाजूच्या खोलीत ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पत्र्याच्या पेटीत हात पाय दुमडून पत्नीचा मृतदेह झाकून ठेवला. खोलीला बाहेरून कुलूप घालून त्याने भावाला फोन केला. मी शिराळ्याला जाणार आहे गाडी घेऊन घरी ये, असा निरोप दिला.
भाऊ घरी आल्यानंतर आरोपी गाडी घेऊन तातडीने निघून गेला. तर दरम्यान मंगेशचा सहा वर्षाचा मुलगा शिवम दारातच उभा राहून रडत होता. त्यावेळी काका निलेश यांनी शिवमचं रडणं थांबवण्याचा प्रयत्न केला आणि रडण्याचं कारण विचारलं, वेळी सहा वर्षाच्या शिवमने मम्मी पप्पाचं भांडण झालंय. पप्पांनी मम्मीला मारून खोलीत ठेवलंय अशी माहिती दिली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान, आरोपी मंगेश हा पोलीस ठाण्यात हजर होऊन त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.