नेमकं प्रकरण काय?
तक्रारदार महिला अधिकाऱ्याचं नाव भारती दीक्षित असून, त्या सध्या वित्त विभागाच्या संयुक्त सचिवपदी कार्यरत आहेत. तर, आरोपी पतीचं नाव आशीष मोदी असे असून ते सामाजिक न्याय व सबलीकरण विभागाचे संचालक आहेत. हे दोघेही २०१४ च्या राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत.
भारती दीक्षित यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, पती आशीष मोदी यांनी दीर्घकाळापासून माझा छळ केला आहे. 'तो मला वारंवार मारहाण करतो आणि त्याने मला घरात बेकायदा डांबून ठेवले होते', असेही त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे. हा छळ केवळ त्यांच्यापुरता मर्यादित नसून, आरोपी पतीने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिल्याचंही दीक्षित यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
advertisement
उच्चपदस्थ अधिकाऱ्याविरोधात कारवाई
या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेत आयएएस अधिकारी आशीष मोदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याविरोधात त्यांच्याच पत्नीने छळ आणि जीवे मारण्याच्या धमकीसारखे गंभीर आरोप केल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राजस्थान केडरच्या या दोन आयएएस अधिकाऱ्यांमधील कौटुंबिक वादाने आता गंभीर स्वरूप धारण केले असून, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
