ही घटना मेरठ पोलीस स्टेशन हद्दीतील सरधना परिसरातील आहे. या ठिकाणी निवृत्त सैनिक संजीव आणि त्यांची पत्नी मुनेश यांच्यात गेल्या 15 वर्षांपासून वाद सुरू होते. त्यांचा 27 वर्षांचा सचिन नावाचा एकुलता एक मुलगा होता. तो त्याच्या आईसोबत राहत होता. सचिनच्या वडिलांना दुसरं लग्न करायचं होतं, पण मुलाचा या लग्नाला विरोध होता. या गोष्टीचा वडिलांना राग आला आणि त्यांनी सचिनला वाटेतून दूर करण्याचा विचार केला.
advertisement
त्यानी पाच लाख रुपयांची सुपारी देऊन कॉन्ट्रॅक्ट किलरला कामावर ठेवलं. अमित असं त्या किलरचं नाव आहे. पाच लाखात पित्याने मुलाच्या हत्येची सुपारी दिली. यानंतर सुपारी घेणाऱ्याने प्लॅनिंग करून सचिनला खूप दारू पाजली आणि नंतर त्याचा गळा आवळून खून केला. इतकंच नाही तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो हिंडन नदीत फेकून दिला. मारणाऱ्याने पोलिसांपासून वाचण्यासाठी बाईक आणि मोबाईल फोन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते.
सचिन घरी परतला नाही, त्यामुळे त्याच्या आईने तो हरवल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे तपास करण्यात आला आणि संजीव यांची चौकशी केली असता संपूर्ण घटना उघडकीस आली. पोलिसांनी सचिनचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसंच आरोपी वडील आणि मारेकऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे. मेरठ पोलीस पुढील तपास करत आहेत.