नेमकं काय घडलं?
18 फेब्रुवारी रोजी बार्शी तालुक्यातील महागाव येथे दोन जणांचे मृतदेह सापडले होते. दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. दोघांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. त्यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. याप्रकरणी पांगरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पण त्यांचा मृत्यू कसा झाला? याची उकल पोलिसांना होत नव्हती. अखेर पोलिसांनी या घटनेचं गूढ उलगडलं आहे. अनैतिक संबंधितातून या दोघांचा मृत्यू झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
advertisement
गणेश अनिल सपाटे आणि शंकर उत्तम पटाडे असं पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावं होती. पोलिसांनी याबाबत तपास केला असता, मयत शंकर पटाडे यांची पत्नी रुपाली हिचे मयत गणेश सपाटे याच्यासोबत अनैतिक प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रुपालीला ताब्यात घेतलं. त्यांनी तिच्याकडे चौकशी केली असता, तिने या प्रकरणाचा धक्कादायक खुलासा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश सपाटे आणि रूपाली शंकर पटाडे या दोघांचं अनैतिक संबंध होते. पती शंकर पटाडे हा दोघांच्या प्रेमात अडथळा ठरत होता. यामुळे आरोपी गणेश याने रुपालीशी संगनमत करून शंकर यांची हत्या करण्याचा कट रचला. 18 फेब्रुवारी रोजी गणेश सपाटे याने आपल्या काही मित्रांसह शंकर पटाडे याला दारू आणि जेवण करण्यासाठी जाण्याचा बहाणा केला.
मध्यरात्री ते महागाव परिसरात गेले. येथील एका तलावाच्या पुलावर दोघांनी उतरून डान्स केला. यावेळी गणेशने शंकर यांना पुलावरून खाली उचलून टाकण्याचा प्रयत्न केला. पण तो स्वत: देखील पाण्यात पडला. यामुळे महिलेचा पती शंकर आणि प्रियकर गणेश दोघांचाही बुडून मृत्यू झाला. दोघांनाही पोहायला येत नसल्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयत गणेश सपाटे आणि कट रचणाऱ्या रूपाली पटाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जातोय.