मुदाराबादमधल्या बढियोवाला आमका या गावात ही घटना घडली आहे. तिथे राहणाऱ्या शुभम चौधरी याचं 12 वर्षांपूर्वी मुरादाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या भगतपूर इथल्या कुकरझुंडी गावात राहणाऱ्या सलोनी चौधरी हिच्याशी लग्न झालं होतं. लग्नानंतर त्यांना एक मुलगा व एक मुलगी झाली. दहा दिवसांपूर्वी पत्नी सलोनी हिचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. पती शुभमने तिच्या माहेरी तिच्या मृत्यूबाबत कळवलं; मात्र पत्नी झोपली असताना तिला साप चावला असं त्यानं सांगितलं. त्यामुळे सलोनीचा मृत्यू झाल्याचं त्यानं म्हटलं. ते ऐकून तिच्या माहेरचे सगळे घटनास्थळी आले.
advertisement
या घटनेबाबत सलोनीचा भाऊ अजित सिंह याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, आपल्या बहिणीची हत्या झाल्याचा आरोप त्यानं केलाय. बहिणीच्या नवऱ्याने तिचा जीवन विमा उतरवला होता. त्याचे पैसे हडपण्यासाठी त्यानं आपल्या बहिणीला सापाच्या विषाचं इंजेक्शन दिलं असं त्यानं म्हटलंय. बहिणीच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध आहेत व बहिणीला त्याची कल्पना होती, असंही तक्रारदारानं म्हटलं आहे.
नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधांवरून त्या पती-पत्नींमध्ये नेहमी वाद होत होते. बहिणीचा नवरा नेहमीच तिला मारायचा. तसंच घटस्फोट देण्याची धमकीही द्यायचा. यावरून अनेकदा पंचायतही भरवली गेली होती. त्यामुळे नवऱ्यानं तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी पती शुभम, सासरे विजय आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
वाचा - नराधम अक्षयच्या पहिल्या दोन बायका सोडून का गेल्या? आईने सांगितलं घरातलं सत्य
सलोनी व शुभम यांच्या प्रकरणात विवाहबाह्य संबंधांवरून त्या दोघांमध्ये उडत असलेले खटके व पत्नी सलोनीचा विमा या मुद्द्यांवरून तिच्या भावानं तिच्या नवऱ्यावर आरोप केले आहेत. पोलिसांनी त्याची दखल घेऊन नवरा, सासरा यांच्यासह चार जणांना अटक केली आहे. सापाच्या विषाचं इंजेक्शन देऊन बहिणीला मारल्याचा आरोप तक्रारदारानं केलाय. पोलीस या घटनेबाबत आणखी माहिती घेत आहेत. या हत्येच्या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे; मात्र महिलेच्या मृत्यूमागचं नेमकं कारण व उद्देश अद्याप कळलेला नाही.
