मुंबईतील कुर्ल्यामध्ये बनावट बिलांच्या आधारे बाजारभावापेक्षा कमी दरात आयफोन विक्री करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात कुर्ला परिसरातून दोन आरोपींना अटक करण्याबरोबरच चार नवे आयफोन जप्त करण्यात आले आहेत. कुर्ला पश्चिमेकडील हालावपूल परिसरात 12 डिसेंबरला गुन्हे शाखेच्या कक्ष 6 ने ही कारवाई केली. आरोपींनी आतापर्यंत 100 ते 150 मोबाइलची विक्री केल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
संशयित व्यक्ती ग्राहकांना बनावट बिलासह स्वस्त दरात आयफोन विक्री करण्यासाठी तेथे येणार असल्याची मुंबई गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून मोहम्मद रमतुल्ला उजेर शेख ऊर्फ रहमतुल्लाह (२१) आणि मोहम्मद ओवेस हानिफ सुमरा (२७) अशा दोघांना मुंबईच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान त्यांच्याकडून चार नवे आयफोन जप्त करण्यात आले आहे. सध्याच्या किंमतींनुसार, त्या चारही नव्या फोन्सची एकूण किंमत पावणेसहा लाख रुपये आहे.
नवाज अन्सारी (झारखंड) हा सायबर फसवणुकीद्वारे इन्स्टामार्टसारख्या ऑनलाइन डिलिव्हरी ॲपद्वारे नवीन आयफोन मिळवून द्यायचा. त्यानंतर हे मोबाइल बनावट जीएसटी बिलाद्वारे ग्राहकांना स्वस्त दरात विकले जायचे. या व्यवहारातून मिळणारा नफा टोळीतील आरोपी वाटून घ्यायचे, अशी माहिती अटक केलेल्या स्वत: आरोपीनेच दिली आहे. आरोपींनी दिलेल्या बिलांवर जीएसटी नंबर आणि कंपनीचा पत्ता बनावट आहे. त्याचा प्रत्यक्ष नोंदणीकृत पत्त्याशी कोणताही संबंध नाही. या आरोपींनी आणखी किती जणांना चुना लावला आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.
बोगस बिलांच्या माध्यमातून आरोपींनी आतापर्यंत 100 ते 150 आयफोन विक्री केली आहे. त्यातूनच त्यांनी प्रत्येकी दोन ते तीन लाख रुपये कमाई केली आहे. या गुन्ह्यातील सलामत हुसेन अन्सारी, गोविंदकुमार प्रजापती आणि नवाज अन्सारीसह इतर आरोपींचा तपास विनोबा भावेनगर पोलिस ठाणे करत आहे.
