नेमकं प्रकरण काय?
नागपूर मधील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरामध्ये सोमवारी रात्री झालेल्या गोळीबारात एका रेस्टॉरंट मालकाचा खून करण्यात आला. अविनाश भुसारी असं हत्या झालेल्या २८ वर्षीय रेस्टॉरंट मालकाचं नाव आहे. मृत अविनाश भुसारी यांचं धरमपेठ परिसरात 'सोशा' नावाचे रेस्टॉरंट आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अविनाश भुसारी हे बाजूच्या 'निंबस लौंज'चे मालक आणि त्यांच्या मित्रासोबत रस्त्यावर बसले होते. यावेळी दोन दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी अविनाश भुसारी यांच्यावर बेछूट गोळीबार केला.
advertisement
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अविनाश भुसारी यांना लगेच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. अविनाश भुसारी याच्यावर आरोपींनी सहा गोळ्या फायर केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने भुसारी यांच्या अवघ्या काही क्षणातच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी नागपुरातील पवन हिरणवार या कुख्यात गुन्हेगाराचा खून करण्यात आला होता. या खुनाच्या घटनेतूनच अविनाश भुसारी यांची हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत अविनाश भुसारी हे रेस्टॉरंट चालवत असून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची गुन्हेगार केस नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत.
