म्हात्रे हा वेगवेगळ्या नावानं मॅट्रिमोनियल साईटवर बनावट प्रोफाईल तयार करत होता. तसेच स्वत:ला इस्रोचा शास्त्रज्ञ असल्याचं सांगत होता. विवाहास इच्छुक महिला, मुलगी गळाला लागल्यानंतर तो त्यांचं लैंगिक शोषण करायचा. तसेच एखाद्या उद्योग व्यवसाय सुरू करण्याचं कारण देऊन त्यांच्याकडून पैसे घ्यायचा. त्यानंतर लग्नाला नकार देत भूमिगत व्हायचा.
advertisement
महिला आणि मुलींच्या फसवणुकीच्या घटना वाढल्या होत्या. तेव्हा याबाबत रबाळे पोलिस ठाण्यात एका तोतया वैज्ञानिकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखा उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांचे पथक तयार केले होते. या पथकातील सहायक निरीक्षक सचिन कोकरे, सतीश भोसले, हवालदार महेश पाटील आदींनी गुन्ह्याशी संबंधित प्रोफाईलवरून तांत्रिक तपास केला. तेव्हा मुलींची फसवणूक करणारा आदर्श प्रशांत म्हात्रे हाच असल्याची खात्री झाली आणि पोलिसांनी त्याला अलिबागमधून अटक केली.
मुलींचे लैंगिक शोषण
आदर्श म्हात्रे हा इस्रोचा वैज्ञानिक, सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी तर कधी उद्योजक असल्याचे सांगत होता. त्याने शासकीय सेवेतील तसेच वर्षाला 20 ते 30 लाखांपर्यंत वेतन असणाऱ्या महिला आणि मुलींना गळाला लावलं होतं. त्यापैकी काही मुलींचं त्यानं लैंगिक शोषण देखील केलं असून अनेकींची आर्थिक फसवणूक केलीये.
96 लाखांची फसवणूक
मॅट्रिमोनियल साईटवर म्हात्रेने 12 बनावट प्रोफाईल तयार केल्या होत्या. यातून त्याने 96 लाख रुपयांची फसवणूक केली होती. त्यातील 89 लाख रुपये पोलिसांनी संबंधित महिलांना परत केले आहेत. तर मोठी रक्कम त्याने गोव्याच्या कॅसिनोमध्ये उडवल्याची माहिती आहे. त्यासाठी त्यानं भाऊ प्रेम म्हात्रे याचं देखील बँक खातं वापरल्याचं पुढं आलंय. त्यामुळे प्रेम म्हात्रेलाही करंजाडे येथून अटक केलंय. अधिक तपास सुरू आहे.
