मिळालेल्या माहितीनुसार, चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यात अधिकारी असलेल्या बाबासाहेब वाडेकर यांच्याशी एका सायबर भामट्याने संपर्क केला होता. १५ ते १७ एप्रिल या कालावधीत आपण कारखान्याचे चेअरमन अमर पाटील बोलत असल्याचं भासवून त्याने संवाद केला. यानंतर इमर्जन्सी असल्याचे सांगत एका बँक खात्यात १ कोटी १० लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगितले. तीन दिवसांतील संवादानंतर विश्वास वाटल्याने वाडेकर यांनी ही रक्कम वर्ग केली.
advertisement
मात्र, संशय वाटल्याने चौकशी केली असता फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर वाडेकर यांनी तातडीने या प्रकाराबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तातडीने तपास सुरू केल्याने आतापर्यंत सहा आरोपी हाती लागले आहेत. गुन्हा दाखल होताच पोलीस आरोपींच्या मागावर निघाले. अवघ्या चार दिवसांत पंढरपूर येथील तीन, हरियाणा, आटपाडी आणि नगर तालुक्यातील प्रत्येकी एका आरोपीला पकडण्यात आले. यातील तिघांना पुण्यातील लॉजवरून ताब्यात घेण्यात आले.
या फसवणुकीच्या गुन्ह्यात आमदार अभिजित पाटील यांच्या पंढरपुरातील आरोपीही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील काहीजणांचे पाटील यांच्या कार्यालयात येणे-जाणे असल्याचे समजते. वेळेत तक्रार आल्याने तपासाला गती देता आली. सध्या सहा आरोपी अटकेत आहेत. फसवणुकीतील काही रक्कम बँकांकरवी होल्ड करून घेण्यात यश आले आहे. ही रक्कम ज्या-ज्या खात्यात वर्ग झाली, त्या खातेधारकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहे.