फसवणूक प्रकरणात अटक केलेले आरोपी हे भारतातील विविध भागातील आहेत. यश भारत पाटोळे (25, रा. कोल्हापूर), यासीर अब्दुल माजिद शेख (34, रा. उंड्री, पुणे), मोहम्मद सुलतान अहमद मोहम्मद जेहरेद्दून (30, रा. पटणा, बिहार), माझ अफसर मिर्झा (24, रा. स्वारगेट, पुणे), हुसेन ताहीर सोहेल शेख (23, रा. संभाजीनगर) आणि बाबूराव शिवकिरण मेरू (41, रा. हडपसर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून याबाबत सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी माहिती दिली.
advertisement
Pune : पुण्याची तरुणी अन् अहमदनगरचा तरुण; वाघोलीत लॉजवर एकत्रच संपवलं जीवन
नेमकं घडलं काय?
समाज माध्यमावर तक्रारदाराला शेअर मार्केट संदर्भात एक जाहिरात दिसली. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर दररोज 10 ते 20 टक्के नफा मिळेल, असे या जाहिरातीत सांगितले. लिंकवर क्लिक केल्यानंतर तक्रारदाराला ग्रुपमध्ये घेण्यात आले आणि 89 लाख 35 हजार 305 रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. गुंतवणूक केली असता त्यांना गुंतवलेल्या रकमेवर तब्बल 8 कोटी 71 लाख रुपये नफा झाल्याचे दाखवले. मात्र, ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता आणखी पैशांची मागणी करण्यात आली. गुंतवलेली रक्कम न देता फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हेगारांचं थेट चीन कनेक्शन
पोलिसांनी चौकशी सुरू केली असता एका बँक खात्यावर आरोपींनी 33 लाख 86 हजार रुपये वळवून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार बँक खात्याची माहिती घेऊन कोल्हापूरच्या यश पाटोळेची ओळख पटवली. त्याला कोंढवा येथून ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याचे साथीदार कोंढवा येथील एका हॉटेलमध्ये बसून चिनी भाषा बोलणाऱ्या विदेशी नागरिकांशी संपर्क साधत सायबर गुन्हे करत असल्याचे पुढे आले.
सहा जणांना अटक
यश पाटोळे याच्यासह आणखी पाच जणांना सायबर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून नऊ मोबाइल संच, 15 सिमकार्ड, एक मेमरी कार्ड, 4 सीसीटीव्ही, आठ चेकबुक, 20 एटीएम कार्ड, एक लॅपटॉप, एक पारपत्र आणि 13 हजार 550 रुपये रोख रक्कम जप्त केली. याप्रकरणात अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हवाला आणि मनी ट्रान्स्फर
चिनी नागरिकांसोबत संगनमत करून आरोपी सायबर फसवणुकीचे गुन्हे करत होते. फसवणुकीसाठी वेगवेगळ्या बँक खात्यांचा वापर केला जात होता. तसेच फसवणुकीची रक्कम घेऊन क्रिप्टो करन्सी आणि यूएसडीटीच्या माध्यमातून चीनमधील आरोपींना पाठवण्यात येत होती. त्यांच्याकडून हवाला, मनी ट्रान्सफर आणि इतर माध्यमांतून आरोपी कमिशन घेत होते, असे पोलिसांनी सांगितले.