भरतपुर - तुरुंगातून काही वेळा रुग्ण पळून गेल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. तसेच अनेक आरोपींवर काही बक्षीसही पोलिसांकडून ठेवल्याचे तुम्ही ऐकले असेल. मात्र, आता पोलिसांनी तुरुगांतून पळून गेलेल्या आरोपीच्या इज्जतीचा पंचनामा केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या आरोपीप्रकरणी एक अनोखी घोषणा केली आहे.
खूबीराम असे आरोपीचे नाव आहे. तसेच राजस्थानच्या भरतपुर जिल्ह्यातील लखनपुर पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे. आरोपी हा मई गावातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध प्राणघातक हल्ला, खुनाचा प्रयत्न, शिवीगाळ, एससी-एसटी ॲक्ट या कलमान्वये पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
advertisement
आरोपी खूबीराम हा मागील बऱ्याच दिवसांपासून फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. यातच आता आरोपी खुबीरामवर भरतपूरचे पोलीस अधीक्षक मृदुल कछावा यांनी केवळ 25 पैशांचे बक्षीस जाहीर केले आहे. बक्षिसाची प्रक्रिया ही आरोपीचा गुन्हा आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ठरवली जाते, असे त्यांनी सांगितले.
तर आता 25 पैशांचे बक्षीस ऐकल्यावर लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तर यासोबतच या विचित्र बक्षिसाच्या घोषणेबाबत लोक वेगवेगळी मते व्यक्त करत आहेत. इतक्या कमी पैशात आरोपीच्या शोध घेण्यावर परिणाम होईल, असे वाटत नसल्याचे काही जण म्हणाले. तर आरोपीने केलेले गुन्हे आणि जाहीर केलेले बक्षीस मेळ खात नसल्याचे काही जण म्हणाले. दरम्यान, फरार आरोपीला पकडून देणाऱ्यास 25 पैशांच्या बक्षीस दिले जाण्याच्या पोलिसांच्या या घोषणेची आता सर्वत्र चर्चा होत आहे. तसेच पोलीस या आरोपीला कधीपर्यंत पकडतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
