सागर मोहोळकर असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे. तो पेशाने पहिलवान असून शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या जत्रेला उपस्थित होता. गावात जत्रेनिमित्त कुस्तीचा फड भरला होता. सागर हाही इथं आला होता. याचवेळी पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळही कुस्ती पाहायला आला होता. इथं आल्यानंतर तो आयोजकांसोबत पहिलवानांना भेटण्यासाठी जात असताना अचानक सागरने घायवळवर हल्ला केला. गर्दीतून वाट काढत त्याने निलेश घायवळला कानशिलात लगावल्या.
advertisement
या प्रकरणी आता वाशी पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल करत सागर मोहोळकरला ताब्यात घेतलं आहे. वाशी पोलीस त्याची कसून चौकशी करत आहे. पोलीस तपासात सागर मोहोळकरचा भयंकर इतिहास समोर आला आहे. तो कुस्तीच्या फडासह गुन्हेगारी क्षेत्राचा पक्का खिलाडी असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. कारण त्याच्यावर याआधी खुनाचे दोन गुन्हे दाखल असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी सागर मोहोळकरला एका खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्याला तुरुंगवास देखील झाला होता. खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असताना सागरने तुरुंगात आणखी एकाचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, तो कुस्तीच्या मैदानात देखील तितकाच पक्का खिलाडी आहे. कारण निलेश घायवळवर हल्ला करण्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच बुधवारी त्याने ईड गावातील कुस्तीची स्पर्धा जिंकली होती. त्याला पहिल्या क्रमांकाचं 31 हजार रुपयांचं बक्षीस देखील मिळालं होतं. ईट येथील कुस्तीच्या स्पर्धा आटोपून तो आपल्या गावी निघाला होता.
दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा त्याने भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या जत्रेला हजेरी लावत निलेश घायवळवर हल्ला केला. आता त्याने हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून केला? यामागे काही पूर्ववैमनस्य होतं का? याची कसलीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पोलीस मारहाणीच्या कारणाचा शोध घेत आहेत.