मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील घायवळ टोळीचा म्होरक्या आणि कुख्यात गुंड निलेश घायवळ हा धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरूड गावात जत्रेनिमित्त आला होता. येथील ग्राम दैवत जगदंबा देवीच्या यात्रे निमित्ताने गावात कुस्तीचा फड भरवला होता. याठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी राज्य भरातून मल्ल उपस्थितीत होते. दरम्यान, प्रसिध्द कुस्तीपटू थापाच्या कुस्तीच्या वेळी निलेश घायवळ याच्यावर हल्ला करण्यात आला.
advertisement
जेव्हा हल्ला झाला, तेव्हा निलेश घायवळ आणि आयोजक हे आखाड्यात पहिलवान यांची भेट घेत होते. तसेच प्रसिद्ध कुस्तीपटू थापाची कुस्ती सुरू असल्याने कुस्तीच्या मैदानाजवळ कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत, अचानक निलेश घायवळवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. हल्ला करणारा दुसरा तिसरा कुणी नसून अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा पहिलवान असल्याची माहिती समोर आली आहे.
गुंड निलेश घायवळवर हल्ला झाल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. हल्ला करणाऱ्या तरुणाला उपस्थित निलेश गायवळच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यानंतर हल्ला करणारा पहिलवान घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती वाशी पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. या हल्ल्यानंतर निलेश घायवळने देखील घटनास्थळावरून काढता पाय घेतला. या हल्ल्यात घायवळला दुखापत झाली आहे का? किंवा कसल्या हत्यारांनी हल्ला केला का? याची अधिकृत माहिती समोर आली नाही. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.