संबंधित व्हिडीओत गुंड निलेश घायवळ हा आयोजकांसोबत कुस्तीच्या मैदानात राऊंड मारताना दिसत आहे. त्याच्या स्वागतासाठी हलगी वाजवल्या जात असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. चार ते पाच जण हलगी वाजवत निलेश घायवळचं स्वागत करत आहेत. हलगी वाजवणाऱ्यांच्या मागे घायवळ आणि कुस्ती स्पर्धेचे आयोजक चालताना दिसत आहे. हे सर्वजण कुस्तीच्या फडात पहिलवानांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
advertisement
दरम्यान, अचानक एका पहिलवानाने निलेश घायवळवर हल्ला केला. हल्ला होताच घायवळ टोळी अॅक्टीव्ह झाली. त्यांनी निलेश घायवळला सुरक्षा देत हल्ला करणाऱ्या पहिलवानाला मारहाण केली. या घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. हा सगळा प्रकार कुस्ती पाहायला उपस्थित असलेल्या एका प्रेक्षकाच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे. आता घायवळवरील हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.
कुख्यात गुंड निलेश घायवळवरील हल्ल्याचा VIDEO
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील घायवळ टोळीचा म्होरक्या आणि कुख्यात गुंड निलेश घायवळ हा धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरूड गावात जत्रेनिमित्त आला होता. येथील ग्राम दैवत जगदंबा देवीच्या यात्रे निमित्ताने गावात कुस्तीचा फड भरवला होता. याठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी राज्य भरातून मल्ल उपस्थितीत होते. दरम्यान, प्रसिध्द कुस्तीपटू थापाच्या कुस्तीच्या वेळी निलेश घायवळ याच्यावर हल्ला करण्यात आला.
जेव्हा हल्ला झाला, तेव्हा निलेश घायवळ आणि आयोजक हे आखाड्यात पहिलवान यांची भेट घेत होते. तसेच प्रसिद्ध कुस्तीपटू थापाची कुस्ती सुरू असल्याने कुस्तीच्या मैदानाजवळ कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत, अचानक निलेश घायवळवर हल्ला करण्यात आला. हल्ला करणारा दुसरा तिसरा कुणी नसून अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा पहिलवान असल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून केला? हल्लेखोराचा नेमका डाव काय होता? याची कसलीही माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेची माहिती वाशी पोलिसांना देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.