रत्नागिरी : नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या २० वर्षांच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना रत्नागिरीत घडलीय. या घटनेने रत्नागिरीत खळबळ उडाली असून सरकारी रुग्णालयातील नर्सेसनी या घटनेचा निषेध करत आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केलीय. धक्कादायक बाब म्हणजे तरुणीवर लैंगिक अत्याचारानंतर ती बेशुद्धावस्थेत सापडली. तिला आता उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
advertisement
बदलापूरसह राज्यात इतर ठिकाणी अत्याचाराच्या घटना ताज्या असताना रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थीनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. नर्सिंगचं शिक्षण घेणारी २० वर्षांची तरुणी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरातून निघाली होती. कॉलेजला येण्यासाठी निघालेल्या या तरुणीवर भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे संतापाची लाट उसळली. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी सरकारी रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं.
मन विषण्ण करणारी अशी ही घटना रत्नागिरीत घडलीय. २० वर्षीय तरुणीसोबत क्रौर्याची परिसीमा गाठल्याचं दिसतंय. रत्नागिरीसारख्या ठिकाणी अशी घटना घडलीय. आम्हाला सुरक्षित वाटत होतं पण अशा घटनेने आता भीती निर्माण झालीय. चुकीच्या गोष्टी घडत आहेत. लवकरात लवकर गुन्हेगाराला पकडून फाशी द्यावी अशी मागणी रुग्णालयातील नर्सेसनी केली.
नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनींनी या घटनेनंतर सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला आहे. राज्यात अत्याचाराच्या घटना घडत असताना पोलीस प्रशासनाकडून तातडीने कारवाईच्या चर्चा होत आहेत. मात्र तरीही अशा घटना घडत असल्याने आम्ही शिकायचं की सुरक्षित आहे की नाही हा विचार करत बसायचं असा सवाल विद्यार्थीनींनी विचारला आहे. आज जी घटना घडली अतिशय वाईट घटना आहे. नर्स स्टुडंट कॉलेजला येण्यासाठी बाहेर पडली. सकाळी सहा वाजता ती निघाली होती. तिच्यासोबत जे घडलं ते धक्कादायक आहे असं नर्सिंग विद्यार्थीनींनी म्हटलं.
