डिएगो नजरत (८३) आणि पाविया नजरत (७९) असं आत्महत्या करणाऱ्या वृद्ध दाम्पत्याची नावं आहेत. डिएगो हे महाराष्ट्रात रेल्वे विभागात अधिकारी होते. मागील काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगार या वृद्ध जोडप्याला फोन करून धमकावत होते. पोलीस अधिकारी असल्याचं भासवून त्यांनी फोटो आयडीचा वापर करून काही लोकांची फसवणूक केल्याची धमकी दिली होती. धमक्यांना घाबरून या जोडप्याने विविध प्रसंगी फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यात पाच लाख रुपये ट्रान्सफर केले होते. तथापि, फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना अधिक पैसे देण्यासाठी छळ सुरू केला. या छळाला कंटाळून अखेर या जोडप्याने आपल्या राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला.
advertisement
या घटनेची अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुलेडा म्हणाले की, जोडप्याच्या घरी एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. "त्यांना (जोडप्यांना) त्यांच्या फोटो आयडीचा वापर करून कोणीतरी सायबर फसवणूक केल्याचा फोन आला. त्यानंतर, फसवणूक करणाऱ्यांनी तो कॉल दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर केला. त्यांच्यात काय संभाषण झाले हे माहीत नाही. त्यांनी या प्रकरणातून सुटका करून घ्यायची असेल तर पैसे द्या, अशी मागणी केली. या जोडप्याने सायबर फसवणूक करणाऱ्यांना पाच लाख दिले होते. पण त्यांना होणारा त्रास कमी झाला नाही. अन्य एका व्यक्तीने सेम पॅटर्नने दाम्पत्याकडे पैसे मागायला सुरुवात केली. त्यानंतर, जोडप्याने ज्या व्यक्तीला आधी पैसे दिले होते त्याला फोन केला. परंतु समोरून कुठलाही प्रतिसाद मिळला नाही. यानंतर जोडप्याने आत्महत्या करणार असल्याचा मेसेज पाठवला आणि काही वेळात मृत्यूला कवठाळलं.
एसपी म्हणाले की, नजरत हे महाराष्ट्रात रेल्वेमध्ये काम करत होते. ते २२ वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर ते आपल्या पत्नीसह बीडी गावात स्थायिक झाले. या जोडप्याला मुले नव्हती. या प्रकरणी सायबर गुन्हे कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.