मुंबई: मुंबईत एका बनावट विनयभंग प्रकरणात 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या अँटी-एक्स्टॉर्शन सेलने सापळा रचून या दोघींना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
advertisement
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेमलता आदित्य पाटकर उर्फ हेमलता बने (वय 39) आणि अम्रिना इक्बाल झवेरी उर्फ अॅलिस उर्फ अम्रिना मॅथ्यू फर्नांडिस (वय 33) या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. एका व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
तक्रारदार अरविंद गोयल हे गोरेगाव पश्चिम येथे राहणारे व्यावसायिक असून, ते ‘गोयल अँड सन्स इन्फ्रा LLP’ ही कंपनी चालवतात. त्यांचा मुलगा रितम गोयल याचा 5 नोव्हेंबर रोजी यश्वी शहा हिच्याशी साखरपुडा झाला होता.
या साखरपुड्याच्या आनंदात 14 नोव्हेंबरच्या रात्री अंबोली परिसरातील एका हॉटेलमध्ये पार्टी आयोजित करण्यात आली होती. पार्टी संपल्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे 2.40 वाजता, रितम, त्याची होणारी पत्नी यश्वी, तिचा भाऊ आणि एक मित्र लिफ्टने खाली येत होते.
याच वेळी एक अनोळखी महिला लिफ्टमध्ये आली. त्या महिलेने रितमवर लेझर लाईट टाकल्याचा आरोप केला. यावरून वाद झाला आणि तो हळूहळू वाढत गेला. लिफ्ट ग्राउंड फ्लोअरवर पोहोचताच त्या महिलेने मोठ्याने आरडाओरड सुरू केली आणि गोंधळ घातला. नंतर या प्रकरणात अंबोली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
‘सेटलमेंट’साठी 10 कोटींची मागणी
या प्रकरणानंतर दोन्ही महिलांनी हा गुन्हा कोर्टाबाहेर मिटवण्यासाठी 10 कोटी रुपयांची मागणी केली. 20 डिसेंबर रोजी हेमलता पाटकर हिने अरविंद गोयल यांना फोन करून अंधेरी पश्चिमेतील एका कॅफेमध्ये भेटण्यास बोलावले.त्या भेटीत तिने गोयल यांना धमकी दिली की, पैसे दिले नाहीत तर त्यांचा मुलगा आयुष्यभर तुरुंगात जाईल आणि कुटुंबाची बदनामी होईल. काही दिवसांच्या चर्चेनंतर खंडणीची रक्कम 5.5 कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आली.
पोलिसांचा सापळा आणि रंगेहाथ अटक
यानंतर अरविंद गोयल यांनी मुंबई पोलिसांच्या अँटी-एक्स्टॉर्शन सेलची मदत घेतली. पोलिसांनी गोयल यांच्यासोबत मिळून सापळा रचला.
आरोपी महिलांना लोअर परळ परिसरात बोलावून 1.5 कोटी रुपये रोख लाच देण्याचे ठरवण्यात आले. या रकमेपैकी काही नोटा बनावट होत्या. पैसे स्वीकारताच पोलिसांनी दोन्ही महिलांना रंगहाथ अटक केली आणि त्यांच्याविरुद्ध FIR दाखल करण्यात आला. या खंडणी प्रकरणात उत्कर्ष नावाचा तिसरा आरोपीही सामील असून, तो सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली असून, संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.
