इंदूरच्या संयोगितागंज पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या वसुधैव कुटुंबकम् नावाच्या सोसायटीत राहणाऱ्या किशोर धामंदे (वय 76 वर्षं) आणि रमा अरोरा यांची पुलकित धामंदे याने हत्या केली. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला हे डबल मर्डरचं प्रकरण घडलं होतं. पुलकितचं मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते; मात्र आपलं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही हे पुलकितला मान्य नव्हतं. त्यामुळे औषधं घेणं तो टाळत असे. औषधं न घेतल्यास पुनर्वसन केंद्रात जावं लागेल असंही वडील आणि बहीण त्याला सांगत असत. त्यानंतर संतापून पुलकित याने घरातलं मुसळ घेऊन बहिणीवर हल्ला चढवला. तिला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या वडिलांना मुसळ लागलं आणि ते जागेवरच कोसळले. नंतर बहिणीवरही त्याने पुन्हा त्वेषाने हल्ला केला. प्रचंड रक्तस्राव होऊन दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर 12 तास आरोपी घरात थांबला. दुर्गंधी येऊ लागताच त्याने घरभर टॅल्कम पावडर शिंपडली आणि रक्ताचे डाग लपवण्यासाठी फिनाइलने फरशी पुसली. नंतर घराला बाहेरून कुलूप घालून तो फरार झाला. नातेवाईकांनी किशोर आणि रमा हे दोघं जण गायब झाल्याची तक्रार नोंदवली. किशोर हे सेवानिवृत्त बँक अधिकारी होते.
advertisement
आरोपीचा शोध कसा लागला?
फरार होताना आरोपी पुलकित याने वडिलांची एटीएम कार्ड्स बरोबर ठेवली होती. त्या एटीएम कार्ड्सवरून तो पैसे काढत असल्यामुळे पोलिसांना ट्रान्झॅक्शन्स कोणकोणत्या ठिकाणी होत आहेत याची माहिती मिळत होती. सगळ्यात आधी बडोदा आणि नंतर गोवा इथे एटीएम कार्ड वापरलं गेल्याचं समजताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. गोव्यातल्या पोलिसांची या प्रकरणात मदत झाली. त्यांनी शोध घेतला असता क्रूझवर ऐश करणारा पुलकित त्यांना सापडल्याचं इंदूर पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
एसीपी तुषार सिंह यांनी सांगितलं, की तो मानसिक रुग्ण असल्याचं त्याला वडील आणि तिघी बहिणी सतत सांगत असत. त्यामुळे तो वैतागला होता. त्यातूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं.
