30 जानेवारी रोजी उत्तम नगर येथील एका घरात चोरी झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. फिर्यादी कमलेश यांनी पोलिसांना सांगितलं की, बुरखा घातलेली एक महिला दुपारी 2 वाजता त्यांच्या घरात घुसली आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 25 हजार रुपयांची रोकड चोरून दुपारी अडीच वाजता निघून गेली.
रविवारी याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त (द्वारका) अंकित सिंह यांनी सांगितलं की, तक्रारीच्या आधारे या प्रकरणी आयपीसीच्या कलम 380 अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला. अनेक पथकांनी तपास सुरू केला. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि बुरखा घातलेली एक महिला संशयास्पदरित्या घरात शिरताना दिसली.
advertisement
डीसीपी म्हणाले की, आम्हाला आढळलं की या महिलेनं घरात जबरदस्तीने प्रवेश केला नाही किंवा कपाटाचा दरवाजा तोडला नाही. त्यांनी सांगितलं की, सीसीटीव्हीमध्ये काळा बुरखा घातलेली एक महिला घरात शिरताना दिसत आहे. त्यावरून पोलीस पथकाचा संशय तक्रारदार कमलेश यांची मोठी मुलगी 31 वर्षीय श्वेता हिच्यावर गेला. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी श्वेताला अटक केली आणि चोरीचे दागिनेही जप्त केले.
अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपी महिलेनं आपला गुन्हा कबूल केला आणि पोलिसांना सांगितलं की तिची आई तिच्या लहान बहिणीवर तिच्यापेक्षा जास्त प्रेम करते. तसंच तिच्यावर काही कर्ज होतं आणि त्यामुळेच तिने चोरीचा कट रचला होता. तिने बहिणीचे दागिने चोरले.
डीसीपीने सांगितलं की, जानेवारीमध्ये आरोपी महिलेने तिच्या आईला मोहन गार्डन परिसरातून उत्तम नगर येथे घर हलवण्यास मदत केली होती. 30 जानेवारी रोजी ती आईच्या घरातील सामान पॅक करत असताना तिने चतुराईने घराच्या चाव्या चोरल्या. ही चोरी करण्यासाठी ती एका सार्वजनिक शौचालयात गेली, तिथे कपडे बदलून ती तिथून आईच्या घरी गेली. नंतर तिने चोरीबद्दल दु:खही व्यक्त केलं. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीनी हे दागिने स्थानिक ज्वेलरी दुकानात विकले होते.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितलं की, चौकशीदरम्यान आरोपी महिलेनं उघड केलं की तिने चोरीची योजना आखली कारण तिची आई तिच्या लहान बहिणीवर जास्त प्रेम करते. तसंच कर्ज फेडण्यासाठी हा प्लॅन केल्याचे श्वेताने पोलिसांना सांगितले. तिनं सांगितलं की चोरलेले काही दागिने आपलेच आहेत, जे तिने तिच्या आईकडे ठेवले होते. तर बाकीचे दागिने तिच्या आईने बहिणीच्या लग्नासाठी बनवले होते.
