सागर मोहोळकर असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे. तो पेशाने पहिलवान असून शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या जत्रेला उपस्थित होता. गावात जत्रेनिमित्त कुस्तीचा फड भरला होता. सागर हाही इथं आला होता. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळही कुस्ती पाहायला आला होता. यावेळी तो आयोजकांसोबत पहिलवानांना भेटण्यासाठी जात असताना अचानक सागरने घायवळवर हल्ला केला. गर्दीतून वाट काढत सागरने निलेश घायवळला कानशिलात लगावल्या आहेत.
advertisement
हा हल्ला होताच घायवळसोबत असलेल्या त्याच्या साथीदारांनी प्रतिहल्ला करत सागर मोहोळकरला मारहाण केली. या हल्ल्यानंतर सागर घटनास्थळावरून पसार झाला. निलेश घायवळ देखील तिथून निघून गेला. या प्रकरणी आता पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल केला आहे. वाशी पोलिसांनी पोलिसासमोरच हाणामारी करून गोंधळ घालण्याचा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घायवळवर हल्ला करणारा सागर सध्या वाशी पोलीस ठाण्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याने निलेश घायवळवर नेमका कोणत्या कारणातून हल्ला केला, याचा शोध पोलीस घेत आहेत.
(निलेश घायवळला मारहाण केल्याचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा)
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील घायवळ टोळीचा म्होरक्या आणि कुख्यात गुंड निलेश घायवळ हा धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरूड गावात जत्रेनिमित्त आला होता. येथील ग्राम दैवत जगदंबा देवीच्या यात्रे निमित्ताने गावात कुस्तीचा फड भरवला होता. याठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी राज्य भरातून मल्ल उपस्थितीत होते. दरम्यान, प्रसिध्द कुस्तीपटू थापाच्या कुस्तीच्या वेळी निलेश घायवळ याच्यावर हल्ला करण्यात आला.
जेव्हा हल्ला झाला, तेव्हा निलेश घायवळ आणि आयोजक हे आखाड्यात पहिलवान यांची भेट घेत होते. तसेच प्रसिद्ध कुस्तीपटू थापाची कुस्ती सुरू असल्याने कुस्तीच्या मैदानाजवळ कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत, अचानक निलेश घायवळवर हल्ला करण्यात आला. हल्ला करणारा दुसरा तिसरा कुणी नसून अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा पहिलवान असल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून केला? याची कसलीही माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेची माहिती वाशी पोलिसांना देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.