कोळ्याचं जाळं आणि बुद्धीचा कस
ग्रँड फिनालेमध्ये सर्वात आधी कोण पोहोचणार? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बिग बॉसने एक अत्यंत कठीण आणि थरारक टास्क दिला होता. या टास्कमध्ये राकेश बापट, तन्वी कोल्ते आणि अनुश्री माने यांच्यात लढत पाहायला मिळाली. स्पर्धकांसमोर 'कोळ्याचं महाकाय जाळं' उभं करण्यात आलं होतं. केवळ शारीरिक ताकदच नाही, तर मानसिक चपळता सिद्ध करण्यासाठी कोळ्याच्या जाळ्यातून मार्ग काढत ७ कठीण प्रश्नांची अचूक उत्तरं द्यायची होती.
advertisement
प्रत्येक पावलावर अडथळे आणि थकवा असतानाही, या तिन्ही स्पर्धकांनी जिद्दीने हा टास्क पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जाळ्यात अडकत-पडत पण ध्येयाकडे धावत असताना या स्पर्धकांचा श्वास फुलला होता.
तन्वी कोल्ते ठरली 'पहिली फायनलिस्ट'
या अटीतटीच्या लढतीत तन्वी कोल्तेने आपल्या वेगवान हालचालींनी आणि अचूक उत्तरांनी राकेश आणि अनुश्रीला मागे टाकलं. तन्वीने अत्यंत कमी वेळात हे आव्हान पूर्ण केलं आणि 'बिग बॉस मराठी ६' ची पहिली फायनलिस्ट होण्याचा मान मिळवला. या विजयामुळे तन्वी या आठवड्यात नॉमिनेशनमधून सुरक्षित झाली असून, तिचं नाव आता थेट ग्रँड फिनालेच्या ट्रॉफीच्या शर्यतीत सामील झालं आहे.
कोण होणार 'मराठी बिग बॉस'चा विजेता?
तन्वीने बाजी मारली असली तरी, आता राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन, रेवा कौरसे, राखी सावंत आणि दीपाली सय्यद यांच्यात उरलेल्या जागांसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या महाअंतिम सोहळ्यात नक्की कोणाच्या हाती विजय येणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
