सिद्धार्थ चांदेकरने नुकतंच इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत आपल्या अगामी चित्रपटाबाबत अपडेट दिली आहे. सिद्धार्थ लवकरच ‘ओले आले’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात सिध्दार्थसोबत मुख्य अभिनेत्री म्हणुन सायली संजीव दिसणार आहे. झिम्मा च्या दोन्ही भागात सायली आणि सिद्धार्थने एकत्र काम केलं आहे. त्यानंतर आता दोघेही ‘ओले आले’ या चित्रपटात दिसणार आहेत. हा सिनेमा येत्या ५ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
advertisement
सिद्धार्थ आणि सायली सोबत या चित्रपटात मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर देखील दिसणार आहेत. बऱ्याच दिवसांनी नाना एका मराठी चित्रपटात दिसणार असल्याने चाहते त्यांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
सिद्धार्थने नुकतंच ‘ओले आले’ चित्रपटातील नाना पाटेकरांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत सिद्धार्थने लिहिलं, ‘आता बाप-मुलाच्या रोड ट्रीपचे काय? ओले आले! 5 जानेवारीपासून! जगुया झगामगा..!’ या पोस्टवरून ‘ओले आले’ चित्रपटात नाना पाटेकर सिद्धार्थ चांदेकरच्या वडिलांची भूमिका साकारणार असल्याचं समजत आहे.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते. या पोस्टरमध्ये सिद्धार्थ चांदेकर, नाना पाटेकर व सायली संजीव रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेताना दिसून आले होते.तसेच चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. या पोस्टबरोबर ‘एक अशा प्रवासाची गोष्ट, ज्याने शिकवले जीवन जगण्याचे सूत्र!’ असे कॅप्शनही दिलं आहे. हा चित्रपट नेमका कशाविषयी आहे, चित्रपटाची कथा काय असेल असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. त्यामुळेच आता या तिघांना एकत्र सिनेमात पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. 5 जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.