रिक्षाचालकाच्या भावाने केली मदतीची मागणी
ANI शी बोलताना रिक्षाचालकाचा भाऊ मोहम्मद समीर म्हणाला,"अपघाताची घटना रात्री साधारण 8 ते 8.30 दरम्यान घडली. माझ्या भावाची रिक्षा पुढे होती आणि त्यामागे अक्षय कुमारची इनोव्हा आणि एक मर्सिडीज येत होती. मर्सिडीजने इनोव्हाला धडक दिली आणि त्यामुळे इनोव्हा रिक्षावर आदळली. परिणामी, माझा भाऊ आणि रिक्षामधील आणखी एक प्रवासी रिक्षाखाली दबले गेले. संपूर्ण रिक्षा उद्ध्वस्त झाली असून माझ्या भावाची अवस्था अतिशय गंभीर आहे. आमची फक्त एवढीच विनंती आहे की माझ्या भावावर योग्य उपचार व्हावेत आणि रिक्षाला झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी. आम्हाला याशिवाय काहीही नको. आम्ही खूप गरीब आहोत, इतका खर्च आम्हाला परवडणारा नाही. परिस्थिती खूप गंभीर आहे. फक्त माझ्या भावावर उपचार व्हावेत, एवढीच आमची मागणी आहे".
advertisement
अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अक्षय कुमारच्या ताफ्यातील कार अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्थानिक नागरिक आणि पोलिस कर्मचारी अपघातग्रस्त रिक्षामधून एका जखमी व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढताना दिसत आहेत. जुहू पोलिसांनी मर्सिडीज चालकाविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंवरून हा अपघात किती भीषण होता, हे स्पष्ट दिसते. या अपघातात रिक्षाचालक आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. दृश्यांमध्ये अक्षय कुमारच्या ताफ्यातील एक गाडी उलटलेली दिसत आहे, तर रिक्षाचे मोठे नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. अपघात इतका भीषण होता की काही क्षणांतच आजूबाजूला मोठी गर्दी जमली.
