कार्यक्रमादरम्यान बोलताना आशा भोसले कलाकारांनी लग्न करू नये, असं म्हणाल्या. हे सांगताना त्यांनी आपल्या मोठ्या बहिणी आणि दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचाही उल्लेख केला. आशा भोसले सोनू निगम यांच्याशी बोलताना म्हणाल्या की, "मी आता ज्या वयात आहे त्या वयात मला असं वाटतं की दीदींनी जे केलं ते खूप योग्य केलं. कोणत्याही आर्टिस्टने लग्न करू नये."
advertisement
या संवादादरम्यान आशा भोसले यांनी लता मंगेशकर यांच्यासोबतच्या आठवणीही सांगितल्या. त्या म्हणाल्या की, "मी जेव्हाही दीदीकडे जायचे तेव्हा मी तिला म्हणायचे की, 'दीदी तू किती सुखी आहेस.' त्यावर दीदी म्हणायच्या, 'हो आशा मी खूप सुखी आहे.'
आशा ताईंनी पुढे सांगितलं की, दीदी म्हणायची, "मी सगळ्यांकडे बघते, सगळ्यांच्या मुलांची अवस्था पाहते. तेव्हा मला वाटतं की मी खूप सुखी आहे आशा. तुमच्यासारखे चार भाऊ-बहिण मला मिळाले आहेत, मी त्यातच आनंदी आहे."
एका जुन्या मुलाखतीत बोलताना लता दीदी लग्नाविषयी म्हणाल्या होत्या, "मी नेहमी हाच विचार करते की, जन्म, लग्न आणि मृत्यू हे माणसाच्या हातात नसतं. ते होऊन जातं." हे सांगताना लता दीदी भावुक झाल्या होत्या.
या व्हिडीओच्या निमित्तानं लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचा आयुष्याचा प्रवास पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभा राहतो. लता दीदींनी लग्न केलं नाही. त्या नेहमीच आपल्या गाण्याशी आणि कुटुंबाशी प्रामाणिक राहिल्या. गाणं आणि कुटुंब हेच त्यांचं आयुष्य होतं.
तर दुसरीकडे आशा भोसले यांनी फार कमी वयात लग्न केलं. लग्नात त्यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यांच्या लग्नाच्या निर्णयामुळे अनेक वर्ष लता दीदींसोबतच्या नात्यात दुरावा आला होता. मात्र लता दीदी नेहमीच आशा ताईंच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. आशा ताईंच्या आयुष्यात आणि करिअरमध्ये लता दीदींचा खूप मोठा वाटा आहे.
