वंदना गुप्ते यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टी उलगडल्या. विशेष म्हणजे, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले त्यांच्या लहानपणापासूनचे नाते आणि आठवणी त्यांनी खूप मोकळेपणाने शेअर केल्या. या मुलाखतीत त्यांनी सांगितले, “बाळासाहेबांचा माझ्यावर खूप जीव होता. ते मला ‘भूत’ म्हणायचे. कधीच माझं नाव घेतलं नाही.”
advertisement
वंदना गुप्ते यांनी एक मजेदार आठवण सांगितली की, “माझ्या आईला क्रिकेटची खूप आवड होती, त्यामुळे आम्ही सामना पाहायला जात असू. एकदा मला बाळासाहेब दिसले आणि मी त्यांच्या हाताला धरून थेट पॅव्हिलियनमध्ये गेले. त्या दिवशीपासून मला क्रिकेटचं वेड लागलं.”
वंदना गुप्ते यांनी बाळासाहेबांच्या कलाकारांवरील प्रेमाबद्दलही सांगितले. “ते नेहमीच कलाकारांची काळजी घ्यायचे. मदतीसाठी कोणी काही विचारले, तर त्यांनी कधीच नकार दिला नाही. माझ्या आईच्या नावाने एका बागेचं उद्घाटन करताना ते स्वतः आले आणि निधीही दिला. त्यांच्या शेवटच्या दिवसांतील काही फोटो माझ्याकडे आहेत. अगदी शेवटच्या 4-5 दिवसांपूर्वीचे फोटो. त्यांच्या बरोबर फार घरगुती नाते होतं. असा माणूस पुन्हा होणं शक्य नाही. महाराष्ट्रासाठी एवढं प्रेम असलेला दुसरा कोणी होणार नाही,” असं म्हणत वंदना गुप्ते भावुक झाल्या.
दरम्यान, या मुलाखतीमध्ये त्यांनी एक खुलासाही केला. त्या म्हणाल्या, “मला राजकारणात जाण्याची संधी होती, पण मी ती घेतली नाही. मला अभिनय हेच क्षेत्र जवळचं वाटतं.”