शूटिंगवरून परतताना काळाचा घाला
मराठी मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारणारी ११ वर्षांची पूर्वा रासम सोमवारी अंधेरी येथे दिवसभर शूटिंगमध्ये व्यस्त होती. तिची आई, प्रणिता रासम दिवसभर तिच्यासोबत होती. शूटिंग संपवून मायलेकी रात्री साडेनऊच्या सुमारास भांडुप स्थानकावर उतरल्या. घरी जाण्यासाठी त्या '६०६' क्रमांकाच्या बसची वाट पाहत उभ्या होत्या. दुर्दैवाने ज्या बसची त्या वाट पाहत होत्या, तीच बस काळ बनून त्यांच्या अंगावर धावून आली.
advertisement
काही कळायच्या आत बसने प्रणिता यांना चाकांखाली चिरडले. आईला वाचवण्यासाठी गेलेली पूर्वा बाजूला फेकली गेली आणि तिच्या डोळ्यासमोर तिची माऊली या जगातून कायमची निघून गेली.
"त्या जीवघेण्या बसेस बंद करा!" चिमुकल्या पूर्वाचा संताप
मंगळवारी आईच्या अंत्यसंस्कारावेळी पूर्वाने फोडलेला टाहो उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. आई गमावल्याचं दुःख तर होतंच, पण व्यवस्थेबद्दल तिच्या मनात प्रचंड संताप होता. ती म्हणाली, "इलेक्ट्रिक बसेसचा आवाजच येत नाही. आधीच्या बसेसचा आवाज यायचा, त्यामुळे लोक बाजूला व्हायचे. पण ही बस मागून कधी आली आणि आईला चिरडून गेली ते समजलंच नाही. माझी आई आता परत येणार नाही, पण या बसेस तातडीने बंद करा, आणखी कोणाचे बळी घेऊ नका!"
बस चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा
भांडुप स्टेशनबाहेरील गर्दीत घुसलेल्या या बसने इतका जोरात धक्का दिला की, लोखंडी विजेचा खांबही वाकला. दरम्यान, अपघातातील मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. घटनेनंतर बेस्ट प्रशासनाने तातडीने चालकाला निलंबित केले असून त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेस्टच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “बस चालकाला आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले होते की नाही, याची सखोल चौकशी केली जाईल.” पोलिसांनी ५२ वर्षीय बस चालक संतोष रमेश सावंत याला ताब्यात घेतले असून बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का, याची तपासणी पोलीस आणि आरटीओ अधिकारी करत आहेत.
रासम कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
मूळचे कुडाळचे असलेले रासम कुटुंब भांडुपमधील एका लहानशा खोलीत राहत होते. प्रणिता यांच्या पश्चात पती, मुलगी पूर्वा आणि ७ वर्षांचा मुलगा अथर्व असा परिवार आहे. प्रणिता यांच्या अंत्ययात्रेत अनेक नागरिक सहभागी झाले होते आणि संपूर्ण भांडुप परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
