काय आहे जय दुधाणेच्या अटकेचं कारण?
जय दुधाणे हा केवळ अभिनेता नसून तो एक व्यावसायिक देखील आहे. ठाण्याचा रहिवासी असलेल्या जयवर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जयने जिम व्यवसायाच्या नावाखाली बनावट कागदपत्रे तयार केली आणि काही दुकानांची बेकायदेशीरपणे विक्री केली. धक्कादायक बाब म्हणजे, त्याने एकाच दुकानाची विक्री अनेक व्यक्तींना करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण व्यवहारात सुमारे ५ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
advertisement
कुटुंबीयही पोलिसांच्या रडारवर
या प्रकरणात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये (FIR) केवळ जयचं नाव नाही, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख आहे. पोलिसांनी जयच्या आई, बहीण, आजी आणि आजोबांचीही चौकशी सुरू केली आहे. विमानतळावर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यात आणखी कोणाकोणाचा समावेश आहेत, याचा तपास आता ठाणे पोलीस करत आहेत.
लग्नाला १० दिवसही पूर्ण झाले नाहीत अन्...
जयच्या अटकेमुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी, म्हणजे २४ डिसेंबर २०२५ रोजी जयने आपली गर्लफ्रेंड आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटील हिच्याशी मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होत असतानाच, नवऱ्याला जेलची हवा खावी लागल्याने त्याच्या पत्नीला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
रिॲलिटी शोचा किंग ते वादाचा केंद्रबिंदु
जय दुधाणेने आपल्या करिअरची सुरुवात 'स्पिट्सविला १३' मधून केली होती, जिथे त्याने विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर 'बिग बॉस मराठी ३' मध्ये तो उपविजेता ठरला. 'गडद अंधार' आणि महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' यांसारख्या मोठ्या चित्रपटांत त्याने काम केलं आहे. मात्र, आता या फसवणुकीच्या प्रकरणामुळे त्याच्या करिअरवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
