बिग बॉसचा यंदाचा सीझनही चांगलाच गाजतो आहे. 'वीकेंड का वार'मध्ये आता टीव्ही मालिकांमधला लोकप्रिय चेहरा असलेली हिना खान सहभागी होणार आहे. नुकताच त्या संदर्भातला एक प्रमोशनल व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला. सध्या कॅन्सरच्या आजाराशी झुंजत असलेल्या हिनाचं सलमाननं कौतुक केलं आणि तिच्या हिमतीला दाद दिली. ते पाहून हिनालाही रडू कोसळलं.
'वीकेंड का वार'च्या सेटवर सलमाननं हीनाचं पुढे येऊन स्वागत केलं; मात्र सलमानला भेटून हिना भावूक झाली. सध्या हिनाच्या आयुष्यात अत्यंत कठीण काळ सुरू आहे. त्यामुळेच तिच्या हिमतीला दाद देताना सलमाननं तिला फायटर म्हणून तिचं स्वागत केलं. स्वतः हातात हात घेऊन तिला तो मंचावर घेऊन आला. त्या मंचावर हिनानेही बिग बॉसमधल्या तिच्या आठवणी शेअर केल्या. या शोनं तिला बरंच काही दिल्याचं तिनं सांगितलं. त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याचं ती म्हणाली.
advertisement
याचा एक नवीन प्रोमो हिना खाननं तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलाय. तो सध्या भरपूर व्हायरल होतोय. हिना खान बिग बॉसच्या सीझन 11 मध्ये सहभागी झाली होती. तिला त्या शोमध्ये 'शेर खान' असं नावही पडलं होतं. त्या शोमधून खूप गोष्टी शिकून मजबूत होऊन आपण बाहेर आल्याचं तिनं सांगितलं. प्रत्येक आव्हानाचा सामना तुम्ही कणखरपणे केलाय. तुम्ही खऱ्या फायटर आहात, असं त्यावर सलमान म्हणाला. सलमानचं ते बोलणं ऐकून हिना खूप भावूक झाली आणि तिला रडू कोसळलं. त्यावेळी सलमाननं तिला मिठी मारून अशीच लढत राहा म्हणत शुभेच्छा दिल्या.
'वीकेंड का वार'च्या सेटवरून बाहेर आल्यावर हिनानं माध्यमांशीही संवाद साधला. बिग बॉसचा सध्याचा सीझनही फॉलो करत असल्याचं तिनं सांगितलं; पण यंदाच्या सीझनमधले पहिल्या तीन क्रमांकांचे दावेदार कोण असतील किंवा सीझनमधला सर्वांत आवडीचा स्पर्धक कोण, याविषयी तिनं काहीही सांगण्यास नकार दिला. हिनानं बिग बॉसच्या घरात जाऊन स्पर्धकांशी संवाद साधला की नाही, हे अजून समजू शकलेलं नाही.
हिना खाननं बिग बॉसचा त्यावेळचा सीझन गाजवला होता. त्यामुळे 'वीकेंड का वार'मधून ती स्पर्धकांशी काय बोलेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.