डीपी दादाची ती गूढ पोस्ट आणि अंकिताचा थेट सवाल
धनंजय पोवारने अलीकडेच आपल्या इन्स्टाग्रामवर एका बहिणीला उद्देशून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं होतं, "काही कारणास्तव भावा-बहिणीच्या नात्यात अबोला आला होता, पण तू कायम माझी बहीण आहेस आणि राहशील." मात्र, सुरुवातीला धनंजयने या पोस्टमध्ये कोणाचाही थेट उल्लेख केला नव्हता. ही पोस्ट वाचून, 'डीपी दादा' आणि अंकिता काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात नव्हते का?' असा संभ्रम चाहत्यांमध्ये निर्माण झाला.
advertisement
धनंजयच्या याच पोस्टचा स्क्रीनशॉट घेऊन अंकिताने तिच्या स्टोरीवर शेअर करत थेट त्याला सवाल केला. ती म्हणाली, "नाव लिहून बोला ना मला... नुसत्या स्टोऱ्या काय ठेवताय..." अंकिताच्या या थेट प्रतिक्रियेनंतर धनंजयने लगेच तीच पोस्ट पुन्हा शेअर केली आणि यावेळी त्याखाली स्पष्टपणे नमूद केलं, "अंकिता प्रभूवालावलकर तुमच्यासाठी आहे." मग ही नेमकी काय पोस्ट होती आणि त्यावर एवढी चर्चा का रंगली, हे पाहूया.
नात्यातील अबोला आणि धनंजयची भावनिक कविता
धनंजयने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने एक भावनिक कविता लिहिली होती. त्याने कवितेत म्हटलं होतं...
"काही दिवसांचा हा अबोला,
वर्षानुवर्षे सरल्यासारखं वाटतं…
नाहीतर तूच ती होतीस,
जिच्याशी मी माझं लपवलेलं दुःख वाटायचो.
रुसवे-फुगवे, भांडणं क्षणभंगुर होती,
तुझं ‘दादा’ म्हणणं माझं विश्व होतं…
आज तुझ्या त्या हाकेची जागा
मौनाने घेतली आहे – फार कठीण वाटतं.
कधीकाळी एकमेकांशिवाय अर्धही नसलं,
आज दोघेही पूर्ण असूनही अधुरं काहीसं वाटतं.
त्या जुन्या फोटोंमध्ये हसणं दिसतं,
पण आतून मात्र… खूप काही हरवतं.
कदाचित चूक कुणाचीच नव्हती,
पण ईगो दोघांचाही थोडा मोठा झाला…
शब्द अपुरे ठरतात – पण भावना सांगतेय,
तू बहिण आहेस… आणि कायमच राहशील."
या पोस्टमुळे धनंजय आणि अंकितामध्ये खरंच अबोला निर्माण झाला होता का, या संभ्रमात चाहते पडले. 'बिग बॉस'पासून त्यांचं बॉण्डिंग चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरलं होतं. अंकिताच्या लग्नातही डीपी दादाने मोठ्या भावाच्या नात्याने कुणालचा कान पिळला होता, जो क्षण चाहत्यांनी खूप एन्जॉय केला होता.
दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, धनंजय पोवार सध्या 'शिट्टी वाजली रे' या कार्यक्रमात दिसत आहे, तर अंकिता वालावलकर नुकतीच तिच्या नवऱ्यासह पंढरीच्या वारीत सहभागी झाली होती. त्यांच्या नात्यातील हा 'अबोल्याचा' किस्सा आता समोर आला असला तरी, त्यांची मैत्री कायम असल्याचंही या पोस्टमधून स्पष्ट झालं आहे.