चित्रपटातील दृश्ये पाहून अनेकांना असं वाटलं की हे चित्रीकरण खरंच पाकिस्तानात झालं आहे का? पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, रेहमान डकैतचं ते भव्य घर पाकिस्तानात नाही, तर आपल्या भारतातील एका ऐतिहासिक शहरात आहे.
'धुरंधर' चित्रपटाची कथा पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर आधारित असली, तरी याचं बहुतांश चित्रीकरण पंजाब आणि चंदीगडमध्ये पार पडलं आहे. चित्रपटात रेहमान डकैतचे कराचीमधील 'लायारी' येथील जे आलिशान घर दाखवण्यात आले आहे, ते प्रत्यक्षात अमृतसरमधील ऐतिहासिक 'लाल कोठी' (Lal Kothi) आहे. आपल्या विंटेज आर्किटेक्चर आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे ही वास्तू पर्यटकांचे आकर्षण असतेच, पण आता 'धुरंधर'मुळे तिला एक नवी ओळख मिळाली आहे.
advertisement
'लाल कोठी'चे केअरटेकर दीपक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या टीमने तिथे दोन दिवस चित्रीकरण केले. यावेळी रणवीर सिंग, अक्षय खन्ना, सौम्या टंडन आणि संजय दत्त यांसारखे मोठे कलाकार उपस्थित होते. विशेष म्हणजे, या ऐतिहासिक वास्तूत चित्रीकरण करण्यासाठी दिवसाला 50 हजार रुपये भाडे आकारले जाते. ही कोठी कोणत्याही एका व्यक्तीच्या मालकीची नसून एका ट्रस्टद्वारे तिचे व्यवस्थापन केले जाते.
चित्रपटाच्या सेट डेकोरेटर सिल्की पंडित यांनी सोशल मीडियावर सांगितले की, "रेहमान डकैतच्या पात्रासाठी हे घर सजवणे हे एक मोठे आव्हान आणि भाग्याचे काम होते." प्रेक्षकांनीही सेट डिझाइनर्सच्या कामाचे भरभरून कौतुक केले आहे. अमृतसरच्या या लाल कोठीला पाकिस्तानातील कराचीचा फील देण्यासाठी टीमने प्रचंड मेहनत घेतली होती, जी पडद्यावर स्पष्टपणे जाणवते.
याआधीही अनेक सुपरस्टार्सनी लावली हजेरी
केवळ 'धुरंधर'च नाही, तर याआधी ऋषी कपूर आणि रेखा यांच्या 'सदियाँ' या चित्रपटाचे चित्रीकरणही याच कोठीत झाले होते.
चित्रपटातील खरी कथा काय?
अक्षय खन्नाने या चित्रपटात 'रेहमान डकैत' ही व्यक्तिरेखा साकारली आहे, जो खऱ्या आयुष्यातील पाकिस्तानचा एक कुख्यात गँगस्टर होता. 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवण्यात त्याचा मोठा हात असल्याचे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पुढे पाकिस्तानचे एसपी चौधरी अस्लम (ज्यांची भूमिका संजय दत्तने केली आहे) यांनी एका चकमकीत डकैतचा खात्मा केला होता.
सिनेमातील एखादी वास्तू कथेमध्ये किती जिवंतपणा आणू शकते, याच उत्तम उदाहरण म्हणजे 'धुरंधर'मधील ही लाल कोठी. तुम्ही जर अमृतसरला जाणार असाल, तर या ऐतिहासिक आणि आता 'फिल्मी' झालेल्या कोठीला नक्की भेट द्या.
