‘तिघी’ चित्रपटामध्ये नेहा पेंडसेने ‘स्वाती’ नावाची व्यक्तिरेखा साकारलीये. नेहाने तिचा चित्रपटाबद्दलचा अनुभव सर्वांसोबत शेअर केलेला आहे. अनुभव शेअर करताना नेहाने सांगितले की, "मला ‘स्वाती’ची व्यक्तिरेखा माझ्या खासगी आयुष्यात जवळची वाटतेय, पण ती माझ्यासारखी अजिबात नाही. माझ्या सख्ख्या बहिणीसोबतचं माझं नातं कॉम्प्लेक्स आहे. ती स्वातीच्या जवळ जाणारी आहे. तिची परिस्थितीकडे बघण्याची पद्धत माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. स्वाती ज्या प्रकारे समजूतदारपणे प्रतिक्रिया देते, ते मला सुरुवातीला स्वीकारणं कठीण गेलं. रिअल लाईफमध्ये लोक इतके संतुलित असतात का, असा प्रश्न पडायचा."
advertisement
मात्र याच व्यक्तिरेखेमुळे नेहाला तिच्या मोठ्या बहिणीकडे नव्या नजरेने पाहाता आल्याची प्रतिक्रियाही नेहाने दिली. "मोठी बहीण असणं सोपं नसतं. तिच्यावर नकळत एक समजूतदारपणाचं आणि मॅच्युरिटीचं ओझं असतं. स्वाती साकारताना मला मोठ्या बहिणीचं दडपण, तिची शांत झुंज आणि तिचं नि:शब्द प्रेम समजलं." असं नेहा सांगते. नेहाने यापूर्वी 'जून' चित्रपटामध्ये निखिल महाजनसोबत काम केलं होतं, त्याबद्दल नेहाने सांगितलं की, "निखिलसोबत काम करताना सगळंच नवीन होतं. कार्यशाळा, व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि विशेष म्हणजे नो मेकअप लूक! कोणत्याही चित्रपटासाठी मी याआधी असं केव्हाच काम केलं नव्हतं. "
नेहाने पुढे सांगितले की, " त्यावेळी मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर होते की, मला काही तरी वेगळं करायचं होतं आणि मी तसं केलं. त्या पद्धतीचं काम केव्हा केलं नसल्यामुळे माझ्यासाठी 'जून' चित्रपट अधिकच आव्हानात्मक होता. त्या वेळी मी थोडी घाबरलेली होते. पण ‘तिघी’ हा त्या झोनमधला माझा दुसरा चित्रपट असल्यामुळे शुटिंगवेळी मी अधिकच कम्फर्टेबल होते. व्यक्तिरेखेचे टप्पे, तिचा पाथवे मला स्पष्ट होता. जीजिविषाच्या संवेदनशील दिग्दर्शनामुळे ते खूप सहज साध्य झालं. अनेक वर्षे एकच काम करत असल्यामुळे मी आतून नर्व्हस होते. मला नेहमीच एकाच प्रकारच्या चित्रपटाच्या ऑफर्स येत होत्या. ज्यामध्ये काम करण्याची आवड होती, तिथे काम मिळत नव्हतं. हिंदीत काम केल्यामुळे मराठी इंडस्ट्रीला वाटायचं मी हिंदीत बिझी आहे आणि हिंदीवाल्यांना वाटायचं मी मराठीत बिझी आहे. त्यामुळे दोन्हीकडे कन्फ्युजन आणि माझ्याकडे काम नाही."
वेगळ्या धाटणीच्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी नेहाला निखिल महाजन, तिचे पती आणि जीजिविषा काळे यांचं मोठं योगदान राहिलंय. "माझं जे व्हिजन होतं, त्याला त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. ‘जून’पासून सुरुवात झाली आणि ‘तिघी’मधून ते एक पाऊल पुढे गेलं," असं नेहा सांगते. ती हसत म्हणते, "काही प्रोजेक्ट्स इतके सहज जुळून येतात की वाटतं, हे होणारच होतं! भारती ताई आणि सोनाली या सगळ्यांच्या तारखा एकत्र जुळून आल्या. काही अडचण आली नाही. हे सगळं इतकं सहज घडलं की ते दैवी होते."
'तिघी’च्या निमित्ताने नेहा नात्यांबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा मांडतांना म्हणते, "आपण नाती खूप कॉम्प्लिकेटेड करून टाकतो. 'आय एम सॉरी' म्हणणं कठीण नसतं, पण आपण ते पुढे ढकलत राहातो. संवाद साधणं फार महत्त्वाचं आहे. गोष्टी वेळेवर बोलल्या गेल्या पाहिजेत." आईबद्दल बोलताना भावुक होत नेहा म्हणाली, "माझा या क्षेत्रात येण्याचा निर्णय आईचा होता. इंडस्ट्रीमध्ये सेटबॅक्स येतात, अस्वस्थता असते. मित्र, वडील 'सगळं ठीक होईल' म्हणतात आणि निघून जातात. पण जी घालमेल असते, ती शांत करण्याची ताकद फक्त आईमध्ये असते. ती थेरपी न मागता मिळते. आईला कळतं, या क्षणी फक्त तिच्या मुलीबरोबर बसून राहाणं गरजेचं आहे, हे तिला माहित असतं."
खऱ्या आयुष्यात नेहा छोटी बहीण आहे, तर चित्रपटात ती मोठ्या बहिणीची भूमिका साकारते. सोनाली कुलकर्णी प्रत्यक्ष आयुष्यात मोठी असल्याने तिच्या व्यक्तिरेखेत काही साम्य होतं. पण नेहासाठी स्वाती पूर्णपणे नवी होती. 'ना जर्नी रिलेटेबल, ना नातं रिलेटेबल'. म्हणून मी खूप प्रश्न विचारले – मोठ्या बहिणीचं आयुष्य कसं असतं?” या शोधप्रक्रियेमुळे तिला तिच्या स्वतःच्या बहिणीकडे नव्या दृष्टीने पाहाता आलं. “ही जर्नी माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग होती. स्वातीच्या माध्यमातून मी मोठ्या बहिणीचं ओझं, तिची नि:शब्द जबाबदारी आणि तिचं प्रेम समजून घेतलं. ‘तिघी’ हा केवळ तीन स्त्रियांची कथा नाही, तो नात्यांना वेळेवर समजून घेण्याचा, संवाद साधण्याचा आणि गृहीत न धरण्याचा संदेश देणारा चित्रपट आहे आणि या प्रवासात नेहा पेंडसे बायस म्हणजेच समजूतदार, शांत तरीही ठाम अशी स्वाती प्रेक्षकांच्या मनात नक्कीच दीर्घकाळ घर करून राहील.
