पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सर्वच पक्षांमध्ये जागावाटपासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच अभिनेते नाना पाटेकर यांना राष्ट्रवादीकडून ऑफर देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. शिरुर मतदारसंघातून नाना पाटेकर यांना विचारणा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पण, नाना पाटेकर यांनी नकार दिला आहे.
पुण्यातील शिरूर मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये अजित पवार यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. अशातच आता शिरूरमधून नाना पाटेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या काळात अजित पवार हे नाना पाटेकर यांच्या घरी गेले होते. त्यावेळी नाना पाटेकर यांनी राजकारणामध्ये येण्याची इच्छा बोलून दाखवली होती.
advertisement
पण अजित पवार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये होते. आता ते महायुतीत सामील झाले असल्यामुळे समीकरण पूर्ण बदललं आहे. शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे यांना टक्कर देण्यासाठी तितक्याच ताकदीचा उमेदवार देण्याची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून नाना पाटेकर यांना उमेदवार देण्याबद्दल विचारणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून शिरूर मतदारसंघात नाना पाटेकर यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा झाली. पण नाना पाटेकर यांचा शिरूर मतदारसंघासोबत फारसा संबंध नाही, त्यामुळे नाना हे या मतदारसंघातून लढण्यासाठी फारसे इच्छुक नाही. त्यामुळेच नानांनी अमोल कोल्हेंच्या शिरूर मतदारसंघातून लढण्यास नकार दर्शवला आहे.
दरम्यान, 'मला राजकारणात जाता येत नाही कारण जे पोटात आहे तेच ओठात येतं. दुसऱ्या दिवशी मला त्या पक्षातून मला काढून टाकतील आणि महिन्याभराने सर्व पक्ष संपलेले असतील. मग कशाला जायचं तिथं? असं परखड मत नाना पाटेकर यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केलं.