विमान कंपन्यांनी अनिश्चित काळासाठी पुढील सर्व उड्डाणे रद्द केली. त्यामुळे अभिनय आणि त्यांच्यासह अन्य मराठी नागरिक कुवेतमध्ये अडकून पडले. पुढे लंडनला जाणे किंवा मायदेशी परतणे यातील कोणतीच शक्यता दृष्टिक्षेपात नसताना युद्धाचीही झळ सोसण्याची भीती निर्माण झाली. कुवेतच्या आकाशात ड्रोन इंटरसेप्शनसारख्या घटना दिसू लागल्याने जीवाचा प्रश्न निर्माण झाला. या संदर्भात अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मदतीचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला.
advertisement
सुभेदार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मदतीची विनंती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत सूत्रे हलवण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री कार्यालयाने वेगाने पावले उचलत विदेश मंत्रालयाशी संपर्क साधला. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदेश मंत्रालयाच्या सातत्याने संपर्कात होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनाही मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा करण्यास सांगितले. कुवेतमध्ये अडकलेल्या अभिनय सुभेदार आणि अन्य महाराष्ट्रीयन नागरिकांना रियाध (सौदी अरेबिया) येथून भारतात परत आणण्याचे नियोजन झाले. मात्र अभिनय सुभेदार यांच्यासह अनेकांच्या व्हिसाचा प्रश्न निर्माण झाला.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर विदेश मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असीम महाजन यांनी अभिनय सुभेदार यांच्यासह काही जणांना सौदी अरेबियाचा व्हिसा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे व्हिसा प्रक्रियेला गती मिळाली आणि अभिनय यांच्यासह अन्य ३० महाराष्ट्रीयन नागरिकांचा कुवेतहून रियाधला (सौदी अरेबिया) जाण्याचा मार्ग मोकळा झाला. सुमारे ७०० किलोमीटर अंतराचा दहा तास प्रवास करून हे सर्व महाराष्ट्रातील नागरिक रस्ते मार्गाने रियाधला सुरक्षित पोहोचले. यानंतर रियाधहून मुंबईकडे जाणाऱ्या फ्लाइटद्वारे त्यांच्या परतीचा प्रवास निश्चित करण्यात आला.
यानुसार आज दिनांक 9 मार्च रोजी रियाधहून हे विमान रात्री 8:40 वाजता (रियाध वेळ) / रात्री 11:10 वाजता (भारतीय वेळ) प्रस्थान करणार असून 10 मार्चच्या मध्यरात्री 3 वाजता मुंबईत पोहोचणार आहे. या विमानातून अभिनय सुभेदार यांच्यासह महाराष्ट्रातील सुमारे ३० प्रवासी सुरक्षितपणे मुंबईत परत येत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत कुवेत येथील भारतीय दूतावासाने आवश्यक सहकार्य केले.
