मराठी सिनेसृष्टीतील लाडका अभिनेता अभिजीत केळकर याने यंदाचा गुढीपाडवा अतिशय जल्लोषात साजरा केला. त्याने या नवीन वर्षात काहीतरी हटके करायचं ठरवलं. इंडस्ट्रीत राहूनही आपल्या मातीशी जोडलेलं राहण्यासाठी त्याने एक पारंपरिक व्यवसाय निवडला आहे. सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट करत अभिजीतने याबाबत माहिती दिली असून चाहत्यांनी त्याच्या नव्या उपक्रमासाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
काय आहे अभिजीत केळकरचा नवा व्यवसाय?
अनेक सेलिब्रिटी व्यवसाय सुरू करण्यासाठी हॉटेल, कपड्यांचा ब्रँड किंवा दागिने असा पर्याय सर्रास निवडतात. पण अभिजीत याला अपवाद ठरला आहे. अभिजीतने महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या मसाल्यांचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या मसाल्यांच्या ब्रँडसाठी त्याने अगदी हटके नाव निवडलं आहे.
'मला यशाची नशा चढली होती', ना घटस्फोट, ना सोबत; पतीपासून 36 वर्ष लांब राहतेय सुपरस्टार गायिका
अभिजीत केळकरने 'अस्सल केळकर मसाले' या नावाने स्वतःचा नवा ब्रँड लाँच केला आहे. भारतीय स्वयंपाकात मसाल्यांना खूप महत्त्व आहे, तेच महत्त्व ओळखून त्याने हा पारंपरिक बिझनेस सुरू केला आहे. त्याच्या या ब्रँडच्या टॅगलाइनमध्येच त्याने आपल्या ब्रँडचा उद्देश स्पष्ट केला आहे. त्याने आपल्या टॅगलाइनमध्ये म्हटलंय, "प्रत्येक घासात अस्सल चव!"
पाडव्याचा मुहूर्त अन् नव्या व्यवसायाची घोषणा
आपल्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी अभिजीत केळकरने गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त निवडला. त्याने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत लिहिलं, "गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर माझा स्वतःचा मसाल्याचा ब्रँड घेऊन आलोय. तुमचे आशीर्वाद, शुभेच्छा आणि प्रतिसाद हवाय. गणपती बाप्पा मोरया." अभिजीतच्या या नव्या इनिंगवर मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी कमेंट्स करत त्याचे कौतुक केले आहे.
