भारतीय संगीतविश्वात ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं, असे महान गायक मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहिद रफी यांनी नुकतंच एक धक्कादायक विधान केलं आहे. त्यांनी थेट गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि त्यांची बहीण आशा भोसले यांच्यावर त्यांच्या वडिलांचा गिनीज रेकॉर्ड थांबवल्याचा आणि त्यांच्या करिअरला नुकसान पोहोचवल्याचा आरोप केला आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.
advertisement
“त्यांना वाटायचं, सगळे त्यांच्या खाली असावेत!”
पत्रकार विकी लालवाणीसोबतच्या मुलाखतीत शाहिद रफी म्हणाले, “लता मंगेशकर आणि त्यांच्या बहिणींना माझ्या वडिलांचा हेवा वाटायचा. त्यांना वाटायचं की, सगळे त्यांच्या खाली असावेत आणि लोकांनी फक्त त्यांनाच ‘नंबर वन’ म्हणावं. माझ्या वडिलांना त्या काळातील पुरुष गायकांकडून कोणतीही समस्या नव्हती, पण महिलांबाबत परिस्थिती वेगळी होती.”
शाहिद यांनी लता मंगेशकर यांच्यावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचा सन्मान मिळवण्यापासून त्यांच्या वडिलांना थांबवल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, १९७० च्या दशकात त्यांचे वडील काही काळ घरी बसून होते, पण तो ब्रेक त्यांनी स्वतः घेतला होता, तो कोणत्याही इतर व्यक्तीमुळे नव्हता.
आशाताई, आता तुम्ही म्हातारे झाला आहात...
आशा भोसले यांनी कथितरित्या केलेल्या ‘रफींच्या आवाजात रेंज नाही’ या वक्तव्यावर शाहिद यांनी सडेतोड उत्तर दिलं. ते म्हणाले, “मला आशा भोसले यांच्यासमोर हे बोलायला कोणतीही लाज वाटत नाही. लताजींनीही माझ्या वडिलांना जाऊन माफी मागितली होती.”
ते पुढे म्हणाले, “१९६० च्या दशकात माझ्या वडिलांकडे आमच्यासाठीही वेळ नव्हता, इतके ते व्यस्त होते. अशा वेळी कोणीही माझ्या वडिलांबद्दल वाईट बोललेलं मी सहन करणार नाही. मग ती कोणतीही व्यक्ती असो. आशाताई, आता तुम्ही म्हातारे झाला आहात, स्वतःबद्दल बोला. माझ्या वडिलांबद्दल कोणी काही बोललं तर मी गप्प बसणार नाही.”
शाहिद रफींच्या या थेट आरोपांमुळे संगीतविश्वात खळबळ माजली आहे. त्यांनी केलेली ही विधानांमुळे आता मोठ्या वादाला तोंड फोडण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप आशा भोसले आणि मंगेशकर कुटुंबाकडून याबाबत कोणतही उत्तर आलेलं नाही.