निक जोनसने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये तो प्रियांकाच्या चित्रपटातील पात्रापासून प्रेरित होऊन एक कॉकटेल बनवताना दिसतोय. यावेळी जेव्हा त्याने कॅमेऱ्यासमोर हात केले, तेव्हा नेटकऱ्यांच्या तीक्ष्ण नजरेतून एक गोष्ट सुटली नाही. निकने प्रियांकाचं मंगळसूत्र स्वतःच्या हातामध्ये एखाद्या ब्रेसलेटसारखं गुंडाळलं होतं.
निक जीजूंनी पुन्हा एकदा जिंकलं भारतीय चाहत्यांचं मन
केवळ या व्हिडिओमध्येच नाही, तर चित्रपटाच्या प्रीमियरवेळी रेड कार्पेटवरही निकच्या हातात हे मंगळसूत्र-कम-ब्रेसलेट दिसून आलं होतं. निकचा हा अंदाज पाहून भारतीय चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलं, "निक जीजू फक्त 'ग्रीन फ्लॅग' नाही तर पूर्ण 'ग्रीन फॉरेस्ट' आहेत." तर दुसऱ्याने लिहिलं, "भारतीय संस्कृतीचा इतका मान राखणारा परदेशी जावई मिळणं भाग्याचं आहे."
advertisement
व्हिडिओमध्ये निक म्हणतोय, "मित्रांनो, आज प्रियांकाचा 'द ब्लफ' रिलीज झालाय. ही फिल्म इतकी कमाल आहे की मी ती दोनदा पाहिली आहे. तिच्या पात्राचं नाव 'ब्लडी मॅरी' आहे, म्हणून मी आज खास ड्रिंक बनवणार आहे." निकने मोठ्या उत्साहाने कॉकटेल बनवलं आणि त्यात प्रियांकाच्या पात्राच्या स्वभावाप्रमाणे बरंच तिखट टॅबास्को सॉस मिसळलं. हे ड्रिंक जेव्हा त्याने प्रियांकाला दिलं, तेव्हा तिनेही आनंदाने दाद देत निकच्या रेसिपीचं कौतुक केलं.
काय आहे 'द ब्लफ'ची स्टोरी?
प्रियांका चोप्रा या चित्रपटात एका अत्यंत वेगळ्या रूपात दिसत आहे. १९ व्या शतकातील कॅरिबियन पार्श्वभूमी असलेल्या या 'अॅक्शन-थ्रिलर' चित्रपटात प्रियांकाने 'ब्लडी मॅरी' नावाच्या एका माजी चाचे राणीची (Pirate Queen) भूमिका साकारली आहे. आपल्या हिंसक भूतकाळाला मागे सोडून कुटुंबासोबत शांततेत जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका स्त्रीला पुन्हा एकदा संकटांचा सामना कसा करावा लागतो, याची ही थरारक गोष्ट आहे.
