मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या विरोधात समन्स जारी केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 13ऑगस्ट रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. राज कुंद्रा आता 15 सप्टेंबर (सोमवार) रोजी आर्थिक दंड विभागाच्या कार्यालयात पोहोचून त्यांचे जबाब नोंदवतील. आर्थिक दंड विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "राज कुंद्राला बुधवारी (10 सप्टेंबर) चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. परंतु त्यांनी त्यांच्या प्रतिनिधीमार्फत सोमवारी (15 सप्टेंबर) रोजी हजर राहण्याची विनंती केली होती."
advertisement
लूकआउट सर्क्युलर का जारी करण्यात आले
गेल्या आठवड्यात, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध आर्थिक दंड विभागाने लूकआउट सर्क्युलर जारी केलं होतं कारण दोघे अनेकदा परदेशात प्रवास करतात. तपासादरम्यान दोघेही मुंबईत उपलब्ध राहावेत यासाठी हे पाऊल उचलण्यात आले.
दीपक कोठारी यांची तक्रार
हे फसवणुकीचे प्रकरण मुंबईतील व्यापारी आणि लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक दीपक कोठारी यांच्या तक्रारीवर आधारित आहे. उद्योगपती दीपक कोठारी यांनी आरोप केला आहे की शिल्पा आणि राज यांनी 2015 ते 2023 दरम्यान त्यांची 60 कोटी रुपयांची फसवणूक केली. दीपकचा दावा आहे की, ही रक्कम कंपनीच्या विस्तारासाठी घेण्यात आली होती. परंतु ती वैयक्तिक खर्चासाठी वापरली गेली. कोठारी यांचा आरोप आहे की शिल्पा आणि राज यांनी सुरुवातीला 12टक्के वार्षिक व्याजदराने 75 कोटी रुपयांचे कर्ज मागितले होते. परंतु नंतर कर वाचवण्यासाठी ते गुंतवणूक म्हणून दाखविण्याचा सल्ला दिला. कोठारी यांनी एप्रिल 2015 मध्ये 31.95 कोटी रुपये आणि सप्टेंबर 2015 मध्ये 28.53 कोटी रुपये हस्तांतरित केले जे बेस्ट डील टीव्हीच्या बँक खात्यात जमा झाले.
कंपनीकडून लेखी हमी आणि राजीनामा
दीपक कोठारी म्हणतात की, एप्रिल 2016मध्ये शिल्पा शेट्टीने लेखी वैयक्तिक हमी दिली होती की ही रक्कम ठराविक वेळेत 12 टक्के व्याजदराने परत केली जाईल. पण काही महिन्यांनंतर, सप्टेंबर 2016 मध्ये, शिल्पाने कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. नंतर त्यांना कळले की 2017 मध्ये कंपनीविरुद्ध 1.28 कोटी रुपयांचा दिवाळखोरीचा खटला सुरू होता, ज्याची त्यांना आधी माहिती नव्हती.
आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचा तपास
प्रकरण 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याने ते जुहू पोलिस ठाण्यातून आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी शिल्पा, राज आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम 403 (मालमत्तेचा अप्रामाणिक गैरवापर), 406 (विश्वासघाताचा गुन्हेगारी हेतू) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.