60 व्या बर्थडे निमित्तानं सलमान खानचा आगामी 'बॅटल ऑफ गलवान'चा दमदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट भारतीय सैन्याच्या शौर्याला अर्पण केलेलं भावनिक अभिवादन ठरत आहे. टीझर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली असून, सलमान खानचा हा आतापर्यंतचा सर्वात गंभीर अवतार पाहायला मिळणार आहे.
'बॅटल ऑफ गलवान'मध्ये सलमान खान भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. कणखर देहयष्टी, शांत पण धारदार नजर आणि नियंत्रित आक्रमकता या सगळ्यामुळे त्याचा हा लूक प्रेक्षकांच्या मनात घर करून जातो. टीझरच्या शेवटच्या क्षणी मृत्यूसमोर छाती ताणून उभा असलेला पाहायला मिळतोय. सलमान खान पाहून अंगावर काटा येतो. मौत से क्या डरना उसे तो आना ही है.. असं तो ठासून बोलताना दिसतोय.
advertisement
टीझरमध्ये हिमालयातील अत्यंत कठोर आणि बर्फाच्छादित प्रदेशाचं वास्तववादी चित्रण करण्यात आलं आहे. उंच पर्वतरांगा, गोठवणारी थंडी आणि सीमांवर लढणाऱ्या सैनिकांची मानसिक व शारीरिक परीक्षा हे सगळं प्रभावी पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. या दृश्यांना गायक स्टेबिन बेन यांच्या भावस्पर्शी आवाजाची साथ लाभली असून, त्यामुळे टीझरची भावनिक तीव्रता अधिकच वाढते. याशिवाय हिमेश रेशमिया यांचं दमदार पार्श्वसंगीत प्रत्येक फ्रेमला अधिक ताकद देताना दिसतं.
दिग्दर्शक अपुर्व लखिया यांनी या चित्रपटातून केवळ युद्ध दाखवण्याऐवजी त्यामागील संघर्ष, त्याग आणि सैनिकांची अदम्य जिद्द पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘बॅटल ऑफ गलवान’ हा केवळ युद्धपट नाही, तर सीमांवर लढणाऱ्या जवानांच्या साहसाची, शौर्याची आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याच्या वृत्तीची कहाणी आहे. हा चित्रपट हेही अधोरेखित करतो की, शौर्य अमर असलं तरी खरा विजय शेवटी शांततेचाच असतो.
या चित्रपटात अभिनेत्री चित्रांगदा सिंग देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. 'बॅटल ऑफ गलवान' हा सिनेमा 17 एप्रिल 2026 रोजी रिलीज होणार आहे.
