कलर्स मराठीवर नुकतीच नव्या मालिकेची घोषणा झाली आहे. या वाहिनीवर लवकरच 'इंद्रायणी' हि मालिका सुरु होत आहे. 'इंद्रायणी' ही एका छोट्या मुलीची मालिका असून त्यात सांची भोयर ही बालकलाकार इंदूच्या भूमिकेत झळकणार आहे. तिच्यासोबतच मालिकेत अभिनेत्री अनिता दाते-केळकर आणि अभिनेता संदीप पाठक झळकणार आहे. या मालिकेचा नुकताच प्रोमो समोर आला आहे.
advertisement
अभिनेत्री अनिता दाते-केळकरला झी मराठीच्या 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून लोकप्रियता मिळाली. तिला अनेक जण राधिकाच्या भूमिकेसाठी ओळखतात. काही दिवसांपूर्वीच ती 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत दिसली होती. तिची रमा ही भूमिका देखील प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर आता अनिता कलर्स मराठीच्या 'इंद्रायणी' या नव्या मालिकेत दिसणार आहे. समोर आलेल्या प्रोमोवर या मालिकेत अनिताची भूमिका थोडीशी खलनायिकेची असणार असल्याचं समजत आहे. ती पहिल्यांदाच संदीप पाठक सोबत झळकणार आहे.
संदीप पाठकविषयी सांगायचं तर तो अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. अनेक दिवसांनी तो मालिकेत झळकणार आहे. याआधी संदीप झी मराठीच्याच 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' मालिकेत झळकला होता. त्यानंतर त्याने चित्रपट आणि नाटकांकडे आपला मोर्चा वळवला. मध्यंतरी त्याने एका डान्स शोचं सूत्रसंचालन केलं होतं. आता अनेक दिवसांनी तो 'इंद्रायणी' मालिकेत दिसणार आहे. त्याला पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहे.
'इंद्रायणी' मालिकेविषयी सांगायचं तर, ही मालिका चिन्मय मांडलेकर लिखित असणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये मालिकेविषयी अजून जास्त आतुरता निर्माण झाली आहे.
